Monday, 22 September 2014


रोपवाटिका...एक हरित पाउल.

परिसंस्था म्हणजे जैविक व अजैविक गोष्टींच्या सहसंबंधातून तयार झालेला समूह. निसर्गाच्या विविध चक्रातून उदा. जलचक्र, नायट्रोजन चक्र ई. च्या माध्यमांतून त्यांचा सहसंबंध जपला जातो. परीसंस्थेमध्ये स्थानिक वनस्पती, प्राणी, पक्षी, जलचर तसेच कीटक हे गुंतागुंतीचे जीवन जाळे तयार करतात. त्या सर्वांचे अस्तित्व हे एकमेकाच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. जीवन आवश्यक गरजांच्या पूर्ततेसाठी एकमेकांवर विसावणे हे परीसंस्थेचे वैशिष्ट्य या संपूर्ण जीवांची गुंतागुंतीचे विविध जाळे विणतो जसे कि अन्नजाळे व जीवन जाळे व प्रत्येकाला वेगळे महत्व प्रदान करतो. हेच जाळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास व स्थिरावण्यास मदत करतात. परिसंस्थेमध्ये झाडांचे एक विशेष स्थान आहे. निसर्गात प्राथमिक उत्पादक व अन्न साखळीची प्रथम व महत्वाची कडी अशी भूमिका त्यांना एक आदराचे स्थान देवून जाते. वराह पुराणामध्ये असे लिहिले आहे की

यावत् भूमंडलात् धत्ते सशैलवनकाननम्
तावत् तिष्ठन्ति मेदिन्यां संतति पुत्र पौतृकी II
देहन्ते परमं स्थानम् यतसुरैरपि दूर्लभम् I
प्राप्नोति पुरूषोनित्यं महामाया प्रसादतः II

 याचा अर्थ असा कि जो पर्यंत या पृथ्वीवर पर्वत, वने आणि सरोवरे आहेत तोपर्यंत जीवांची उत्पती होऊन ते सुखाने जगतील. ज्यांना ही गोष्ट कळेल त्यांना महामायेच्या (निसर्गदेवतेच्या) प्रसादासह देवांनाही दुर्लभ असे परमस्थान प्राप्त होईल (संधर्भ: आपले वृक्ष- श्री. द. महाजन). पक्ष्यांसमवेत इतर जीवांसाठी खाद्य, निवारा तसेच घरट्यासाठी काड्या पाने, फुलपाखरे विशिष्ट झाडांच्या पानांवर अंडी घालतात व नंतर त्याच्या आळ्या सदर पाने खातात. जमिनीवर गळून पडलेली पाने कुजल्यावरती त्यातील पोषकद्रव्ये मातीत मिसळून जमिनीची पोत वाढविण्यास तसेच जलचक्र अबाधित ठेवण्यातही मदत करतात. एक झाड हे जणू एक परिसंस्था असते ती निसर्गातील प्रत्येक सजीवाच्या सहजीवनामध्ये महत्वाची भूमिका बजावते. त्याचप्रमणे निसर्गातील इतर अजैविक घटकांच्या बाबतीत ही महत्वाची भूमिका निभावतात जसे कि माती ची धूप वाचविण्यास, बाष्पोत्सार्जन प्रक्रियेद्वारे जल चक्रात अशा पारंपरिक प्रकीरियेत व नवीन माहितीतून पुढे आलेल्या माहितीनुसार ध्वनी कंपने शोषुन ध्वनी प्रदूषण कमी करण्यात मदत करतात. एकंदरीतच निसर्गाचा समतोल राखण्यामध्ये झाडांचा महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे स्थानिक वृक्षांचे महत्व अधिक वाढते.
आपल्या भागात नैसर्गिक रीतीने वाढणारे वृक्ष ते आपले वृक्ष! दुर्दैवाने, स्थानिक वृक्ष, जीवन जाळीची एक महत्वाची कडी, धोकादायक वेगाने नष्ट होत आहेत. एखाद्या स्थानिक वृक्षाच्या प्रजातीचे नष्ट होणे म्हणजे त्या परीसंस्थेतील त्या वृक्षावर अवलंबून असणारा कीटक प्रजाती नष्ट होतील म्हणजेच त्या किटकाचे भक्षण करणारा पक्षी देखील नष्ट होण्याची शक्यता असते. आपणा सर्वांनातर डोडो पक्षी व कॅल्वेरिया मेजर या झाडाची गोष्ट माहितीच आहे, डोडो पक्ष्याची प्रजाती समूळ नष्ट झाल्यावरती सदर झाडाचे बीज प्रसारण झालेच नाही व जी प्रक्रिया त्या बियांवरती अन्ननलीकेतून होत असायची ती प्रक्रिया बंद झाल्याने कॅल्वेरिया मेजर हि  झाडांची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आपल्या परिसरात ही अशी सहसंबधाची बरीच उदाहरणे दिसून येतात, त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाला धोका हा स्थानिक जातींच्या झाडांचे कमी होणारे प्रमाणे एकंदरीत काय तर अधिवास नष्ट-प्रजाती नष्ट!
महाराष्ट्राला पश्चिम घाटाच्या माध्यमातून समृद्ध अशी वनसंपदा व वन्यजीवांची संपत्ती लाभली आहे. गेले हजारो वर्ष मनुष्य ही निसर्ग संपत्ती प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरुपात उपभोगत आहे. दैनंदिन उपजीविकेसाठी जंगलातील विविध घटकांचा वापर हा काही नवीन नाही व तेवढाच पर्यावरण पूरक होता कारण कि तो संतुलित वापर असायचा. परंतु, वाढत चाललेली लोकसंख्या, औद्योगीकरण, प्रदूषण, जंगलतोड, वणवा, चराई आणि खाणकाम अशा प्रश्नांनी जंगले नाहीसे होत चालली आहेत. न्यू इंग्लिश स्कूल सोलगाव हे रत्नागिरीतील पश्चिम घाटात वसलेले एक खेडे गाव. पूर्वी निसर्गसौंदर्याने नटलेले हे गाव आता विकासाच्या व बदलत्या शेती पद्धती व आंबा व काजू सारख्या एकसुरीच्या लागवडीमुळे इतर झाडांच्या प्रजाती नष्ट होत चालल्या आहेत. एकेकाळी मुबलक असणाऱ्या स्थानिक प्रजातींच्या वनस्पतींचे प्रमाण कमी होत चालले असल्याचे एकंदरीतच परिसराचा अभ्यास व पाहणी केल्या असता तसेच जुन्या जाणत्या नागरिकांच्या बोलण्यातून जाणवते. अर्थातच ही सुरुवात आहे व जे काही भविष्यात होणार आहे ते पर्यावरण अथवा मनुष्य या दोघांच्याही हिताचे नव्हते. सदर परिस्थीची गंभीरता ज्या वेळेस विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आली त्यावेळी हे सर्व विधारक होते ज्या वेळीस त्यांना पूर्व व सद्य स्थितीचा फरक समजाविण्यात आला तसेच स्थानिक व विदेशी वृक्ष कोणते; विदेशी वृक्षांचे अपाय काय व त्यांच्या लागवडीमुळे ओढवणाऱ्या संकटापासून वाचण्यासाठी आपण काय करू शकतो हे सांगितल्यानंतर त्यांनाही काहीतरी नवीन करण्याची उर्मी आली. चर्चेअंती असे ठरविण्यात आले होते कि स्थानिक प्रजातींच्या रोपांची रोपवाटिका करून त्यांचे वृक्षारोपण शाळेच्या आवारात, रस्त्यांच्या कडेला तसेच पडीक जमिनीवरती इत्यादी ठिकाणी करावयाचे. कोणत्या प्रजातीची रोपे लावावीत, रोपवाटिका कशी तयार करावी, कुंपणे, खते, पुरण भरणे इत्यादी तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण योजना प्रमुख श्री. सचिन पाटील यांना पर्यावरण शिक्षण केद्र आयोजित प्रशिक्षण कार्यशाळे दरम्यान मिळाले व या उपक्रमाच्या नियोजन ते अंमलबजावणी च्या प्रत्येक टप्प्यास मार्गदर्शक ठरले. नियोजनाप्रमाणे स्थानिक प्रजातीचे लहान रोपे आणून त्यांची शाळेच्या आवारात छोटीशी रोपवाटिका तयार करून काही कालावधीनंतर त्यांचे रोपण करायचे निश्चित झाले. याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी ५० विद्यार्थ्यांचे ५ विद्यार्थ्यांचा एक असे एकूण १० गट पाडण्यात आले व रोपावाटीकेची कार्ये ही वाटून देण्यात आली. देशात एक मुल एक झाड असा कार्यक्रम राबवीत असताना येथे एका विद्यार्थी ३ टे ४ रोपांची पूर्ण निगा राखत होता! या संपूर्ण प्रक्रियेदरम्याण एक महत्वाचा बदल नकळत घडत होता; तो म्हणजे “रोपटे व विद्यार्थी यांच्यातील नाते”. फक्त वृक्षारोपण करून सदर कार्य संपत नसून लावलेली रोपे ही जगली पाहिजेत व ती विद्यार्थ्यांच्या सहाय्याने जगवली पण पाहिजेत ही काहीशी अडचणीची वाटणारी गोष्ट या स्थापित झालेल्या नवीन नात्यामुळे सहज शक्य अशी भासू लागली.
रोपावाटीकेची सुरवात विविध झुडूप वर्गीय, औषधी, फळझाडे इत्यादी विविध प्रकारची रोपांच्या संकलाणाने सुरु झाली.
रोप
संख्या
कोरफड
अडुळसा
मावडा
ओवा
कडुलिंब
गवती चहा
कडीपत्ता
१५
कोकम
दालचिनी
आंबा
६२
गुलाब
२५
काजू
१३
पेरू
चिकू
तेरवड
एकूण
१७०

बनविलेल्या गटांमधून ही रोपे त्यांची निगा राखण्याची जबाबदारीसाठी वाटून दिली. गावातील मोकाट व चरण्यासाठी सोडलेल्या जनावरांपासून रोपांचे सरंक्षण करण्यासाठी वाळलेल्या फांद्यांचे तसेच बांबूपासून ४ ते ५ फुट उंचीची सरंक्षण भिंत बांधली. रोपांच्या योग्य वाढीसाठी “ग्रीन हाउस” सारखा प्रयोग ही विद्यार्थ्यांनी राबविला त्यामुळे रोपवाटिकेस नियंत्रित वातावरण पुरविण्यास मदत झाली. रोपांना पाणी झाऱ्याने ग्रामपंचायतीच्या १००० लिटरच्या पाण्याच्या टाकीतून मधल्या सुट्टीत घालायची जबाबदारी प्रत्येक गटाला एक दिवसांप्रमाणे नेमून दिली गेली होती.  हिरवीगार व टवटवीत दिसणाऱ्या रोपांकडे पाहून न चुकता पार पाडलेल्या या जबाबदारीची पोचपावती आपोआप मिळते. याचबरोबर शाळेमध्ये गांडूळ खताचा प्रकल्प सुरु होताच, त्यातून निर्माण झालेला खत विद्यार्थ्यांनी रोपांची मुलद्रव्यांची भूक खत घालून भागविली. यामुळे शाळेतील कुजणाऱ्या कचऱ्याचे उपयुक्त अशा खतामध्ये रुपांतरीत करण्यास व कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास मदत झाली.
उपक्रम राबवीत असताना बऱ्याच अडचणी येत होत्या. जनावरांपासून रोपे खाण्याच्या भीती पासून ते पाण्यासारख्या कोकणातील भीषण समस्या ही मोठी अडचण होती. रोपावाटीकेसाठी पाणी ही मोठ्या प्रमाणात लागत होते. शाळेत पाण्याचा एकमेव स्त्रोत म्हणजे ग्रामपंचायतीची १००० लिटरची सेंटेक्स ची टाकी, ज्याचा मुख्य वापर ग्रामपंचायत कार्यालय व विद्यार्थ्यांसाठी पिण्यासाठी होता. शाळेच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या मदतीने पाणी झाऱ्याने रोपवाटीकेस उपलब्ध करून दिले जायचे परंतु शाळांना सुट्टी लागताच हे नियोजन निरोपयोगी ठरायचे. मेहनतीने वर्षभर जगविलेली रोपे उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या अभावाने मरू नयेत यासाठी १००० लिटरची टाकी योजनेतील निधीअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आली. भविष्यात सदर टाकी ही शाळेच्या नवीन इमारतीमध्ये छतावरील पाण्याचे संकलन करून ठेवण्यासही वापरण्यात येणार आहे. शाळेतील शिपाई सुट्टी दरम्यान सदर टाकीतील पाणी रोपांना देऊन त्यांची योग्य ती काळजी घेईल असे नियोजन शाळेने आखले आहे.
या सर्व प्रयत्नातून निश्चितच स्थानिक प्रजातीच्या झाडांची रोपण करून निसर्गाचा समतोल पुनर्वत होण्याची आशा आहे. तंत्रीकबाबी पाहता असे लक्षात येते कि, सुद्रुड व निरोगी रोपे तयार करण्याचा शाळेचा प्रयत्न योग्य मार्गाने चालला आहे. येत्या जुलै २०१४ महिन्या मध्ये सदर १७० झाडांचे वृक्षारोपण करण्याचे नियोजित आहे. योजनेंतर्गत सहभागी ५० विद्यार्थ्यांमधील प्रत्येक विद्यार्थी ३ ते ४ रोपांची पुढील २ वर्षांसाठी काळजी घेईल व त्याच्या पुढच्या वर्षीच्या नवीन गटाकडे जबाबदारी सुपूर्त करतील. अशा रीतीने जुनी रोपे सांभाळली ही जातील व नवीन रोपे रोपवाटिकेत तयार करून रोपण ही केले जातील. तसेच रोपे विकत आणण्यापेक्षा या वर्षी बीज संकलन करून त्यांपासून रोप तयार करून रोपवाटिका तयार करण्याचा नवीन संकल्प ही शाळेने हाती घेतला आहे. उन्हाळी सुट्टीच्या आगोदरच योजनाप्रमुखांच्या मार्गदर्शनखाली सर्व गटांनी मिळून आपट्याच्या झाडांच्या बिया संकलित केल्या व उन्हाळी सुट्टी दरम्यान बीज संकलित करावयाच्या उपक्रमाचे थोडक्यात कृतीआधारे प्रशिक्षण ही घेतले. दसऱ्याच्या सणावेळी आपट्याची पाने तोडण्याऐवजी शाळेतील रोपवाटिकेत तयार करण्यात आलेली आपट्याची रोपे भेट देवून साजरा करण्याचा आग्रह केला आहे.
रोपवाटिका हा मुद्दा केंद्र स्थानी ठेवून सदर उपक्रम राबविताना शाळेने गांडूळखत निर्मिती प्रकल्पाद्वारे कचरा व्यवस्थापन, विकत घेतलेल्या पाण्याचे टाकीचे छतावरील पाण्याचे संकलनाद्वारे पाणी संवर्धन, तसेच आपल्या परिसरातील आढळणाऱ्या वनस्पतींचा व त्यांवर अवलंबून असलेल्या सजीवांचा केलेल्या अभ्यासाद्वारे जैवविधता सारख्या संबधित विषयांचे ज्ञान ही मिळविले. पर्यावरण शिक्षणाची सांगड घालत शाळेने स्थानिक पर्यावरण समस्या सोडविण्याचा केलेला हा प्रयत्न स्तुत्य आहे. एका इंग्रजी म्हणीचा नकळत अर्थ हि समजवून गेले- PLANT A TREE, PLANT A HOPE (झाडे लावा, सकारात्मक जीवनाची नवीन आशा निर्माण करा.)
रोपवाटिका

रोपवाटिका 



शाळेतील रोपवाटिका



सुट्टी दरम्यान रोपवाटीकेतील रोपांची निगा राखण्याचे स्वप्रेरनेने काम करताना शाळेचा कर्मचारी श्री. अजित गुरव.


जेवणाच्या सुट्टी दरम्यान रोपांना पाणी घालताना विद्यार्थी.

रोपवाटिका 


रोपवाटिके शेजारील कंपोस्ट खड्डा