Wednesday, 7 December 2016

मुठाई मोहत्सवात घेतली बोडखे सरांच्या कामाची दखल


पर्यावरणाचा सुरु असलेल्या ऱ्हासाबाबत आपण नेहमीच ऐकत, वाचत व बोलत असतो. परंतु हा ऱ्हास थांबविण्यासाठी खूप कमी लोक, संस्था कार्यरत असतात. पर्यावरणातील एका विषयातील समस्या सोडविण्यासाठी खूप जणांनी आपल आयुष्य वाहून घेतलेले आहे. परंतु असे लोक त्यांच्या वैयक्तिक स्तरावर काम करत असतात त्यामुळे त्याचं काम सर्वांपर्यंत पोहचत नाही. अशा लोकांना प्रकाश झोतात आणण्यासाठी जीवित नदी संस्था गेल्या दोन वर्षापासून अनसंग हिरोनावाने सत्कार समारंभ आयोजित करत आहे. यामध्ये नदी संवर्धनासाठी वैयक्तिक स्तरावर जाणीवजागृती व कृती उपक्रम राबविणाऱ्या व्यक्तींचा सत्कार केला जातो.

या वर्षी सत्कारासाठी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कोंढार चिंचोली गावात जि.प. प्राथमिक शाळेत  कार्यरत असणाऱ्या ध्येयवेड्या श्री बाळासाहेब बोडखे या शिक्षकाची निवड करण्यात आली आहे. कोंढार चिंचोली गावात कार्यरत असणाऱ्या बोडखे सरांचा सत्कार जलतज्ञ श्री राजेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात आला.

बोडखे सर व पर्यावरण विषयाचा संबंध पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन पुरुस्कृत पर्यावरण सेवा योजनेच्या माध्यमातून आला. सदर योजनेची राज्य सनियंत्रण संस्था म्हणून पर्यावरण शिक्षण केंद्र काम पाहते. बोडखे सरांनी पर्यावरण सेवा योजने अंतर्गत पुणे येथे शिक्षक प्रशिक्षण घेवून आपल्या कामाला सुरुवात केली. पाणी, उर्जा, घनकचरा, जैवविविधता अशा विषयाचा योजनेमध्ये समावेश आहे. योजने अंतर्गत कृती उपक्रमावर जास्त भर दिला जातो. जेणेकरून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सभोवतालच्या बाबींचे निरीक्षण व अभ्यास करून पर्यावरणीय समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा असा उद्देश आहे.

कोंढार चिंचोली हे उजनीच्या धरणक्षेत्रात वसलेले पुनर्वसित गाव आहे. पूर्वी गावात पाण्याची वणवण होती, परंतु उजनी धरण झाले आणि गावाचा कायापालट झाला. गावतील लोक सधन झाली. बोडखे सर गावात साडेपाच वर्षापासून कार्यरत आहे. पर्यावरण सेवा योजने अंतर्गत त्यांनी पाणी व्यवस्थापन विषयवार काम सुरु केले तेंव्हा अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. उजनी धरणामधील पाणी व या पाण्याचा गावातील नागरिकांचे आरोग्य एवढ्यापर्यंतच हा अभ्यास सीमित नव्हता. पाण्याचा गावातील नागरिकांच्या आर्थिक व सामाजिक स्थितीवर कसा परिणाम होतो याचाही अभ्यास केला. याचबरोबर पर्यावरणीय दृष्टी पाण्याचा इतर घटकांवर होणारा परिणामही अभ्यासण्यात आला. माणसांबरोबर जनावरांवर पाण्याचा होणारा परिणाम अभ्यासण्यात आला. जनावरांच्या डॉक्टरांच्या मुलाखतीमधून अनेक धक्कादायक माहिती विद्यार्थी व शिक्षकांसमोर आली. दुषित किवा क्षार युक्त पाणी पिल्यामुळे जनावरांचा भाकड कालावधीमध्ये वाढ होत आहे, त्याचा परिणाम नागरिकांच्या आर्थिक स्थितीवर होत आहे.

याचबरोबर पर्यावरण सेवा योजने अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या पाणी तपासणी किटच्या आधारे नदीच्या पाण्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. गावतील मासेमारी व्यवसाय करणाऱ्यांची मुलाखत घेण्यात आली, माशांच्या जाती कशा प्रकारे धरणातून लुप्त होत गेल्या व सद्यस्थितीला उपलब्ध असणारी फक्त चीलापी (तिलापिया) जातीचा मासा याबाबत माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. माश्यांची कमी होणारी संख्या व त्याचा मासेमारी व्यवसायावर होणारा परिणाम व आर्थिक स्थितीवर होणारा परिणाम विद्यार्थ्यांनी समजून घेतला.

अशा प्रकरे अभ्यास करायचा म्हणून अभ्यास न करता एखाद्या समस्येच्या मुळापर्यंत जावून त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न बोडखे सर व त्यांच्या विद्यार्थ्यांनी योजने अंतर्गत केला. संकलित केलेल्या माहितीचा सहसंबंध लावण्याचा प्रयत्न केला व तो गावकऱ्यापुढे मांडला. गावकऱ्यानीही सदर अभ्यासाची दाखल घेत शाळा राबवत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. संकलित केलेल्या माहितीच्या आधारे भविष्यात योजने अंतर्गत 
लोकसहभागातून पाणी व्यवस्थापनाचे विविध कृती उपक्रम राबविले जाणार आहेत. 

या सर्व बाबींची दाखल जीवित नदी संस्थेने घेवून बोडखे सरांचा सत्कार २६ नोव्हेंबरला बोडखे सरांचा सत्कार जलतज्ञ श्री राजेंद्र सिंह यांच्या हस्ते पुणे येथे करण्यात आला. सदर सत्कारामुळे सरांना पुढील काम जोमाने करण्याची प्रेरणा मिळाली.

सदर उपक्रम बोडखे सरांनी पर्यावरण सेवा योजनेचे विभाग समन्वयक श्री गणेश सातव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविले आहेत. उपक्रम राबविताना शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय खाटमोडे, सहशिक्षक तुकाराम माळकर, इतर शिक्षक व सर्व विद्यार्थ्यांचे अमुल्य सहकार्य लाभले.



Friday, 1 April 2016

पर्यावरण सेवा योजने अंतर्गत कोंढार चिंचोलीच्या
विद्यार्थ्यांनी साजरी केली पर्यावरणपूरक रंगपंचमी
 रंगपंचमी म्हणजेच रंगाचा सण, रंगांची मुक्त उधळण  यामध्ये लाल, गुलाबी, हिरवा, पिवळा,निळा असे विविध रंग येतात. आपण सर्वजण खूप उत्साहाने रंगपंचमी साजरीकरतो.
रंगपंचमीचा सण पूर्वापारापासून साजरा केला जातो. पूर्वी रंगपंचमी साजरी करण्याकरिता नैसर्गिक व आयुर्वेदिक रंगांचा वापर केला जात होता. कोरड्या रंगाला ‘गुलाल’ तर रंगीत पाण्याला ‘रंग’ असे म्हणत. असे नैसर्गिक रंग घरच्या घरीच बनविले जात. नैसर्गिक रंग लावल्यानंतर एकदा पाण्याने धुतले कि सगळा रंग निघून जायचा. असे रंग बनविण्यासाठी प्रामुख्याने पळस, पांगारा, जास्वंद, झेंडूची फुले, बीट, हळद, मेहंदीची पाने, डाळीचे पीठ  यासारख्या घटकांचा वापर केला जात होता.   
काळ बदलत गेला तसा रंगपंचमी साजरी करण्याची पद्धतही बदलत गेली. नैसर्गिक घटकापासून तयार केलेल्या रंगाची जागा आता रासायनिक रंगानी घेतली. नैसर्गिक रंगाच्या तुलनेत स्वस्त आणि दीर्घकाळ टिकणारे रंग सर्रास विकले जावू लागले आहेत. ओले रंग, पेस्ट, पावडर, आणि वार्निशचा रंगपंचमीनिमित्त उपयोग वाढला. रंगपंचमी
साजरी करताना आपण रासायनिक रंगाचा वापर मोठ्या प्रमाणात करतो.
रासायनिक रंगामध्ये शरीरासाठी अत्यंत घातक अशी ऑक्साईड, कॉपर सल्फेट, अॅल्यूमिनिअम ब्रोमाईड, मर्क्युरी सल्फाईड अशी विषारी रसायने टाकलेली असतात. या रासायानामुळेच हे रंग गडद होतात व दीर्घकाळ टिकतात.
वास्तविक पाहता काही रंगांच्या डब्ब्यावर ‘केवळ औद्योगिक उपयोगासाठी’ असा स्पष्ट उल्लेख असतो. कृत्रिम रंगांचे काही परिणाम तत्काळ दिसून येतात तर काही दीर्घकाळाने दिसून येतात. यामध्ये तात्पुरता आंधळेपण, चेहऱ्यावर पुरळ येणे, त्वचेला खाज येणे याचबरोबर डोळ्यांची जळजळ होणे यासारखे परिणाम होतात. याचबरोबर कृत्रिम रंग सांडपाण्याच्या माध्यमातून पाण्यात मिसळून पाणी प्रदुषित करू शकतात.  
सध्या महाराष्ट्र दुष्काळात होरपळून निघत आहे. सर्वत्रपाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. रंग खेळताना पाण्याचा अपव्यव पण खूप होतो.
या सर्व बाबींचा अभ्यास जि.प. कोंढार चिंचोली ता.करमाळा, जि. सोलापूर शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण सेवा योजने अंतर्गत केला.यामुळे विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक रंगपंचमी साजरी करण्याचे ठरविले. विद्यार्थ्यांनी केलेल्या संकल्पाला पर्यावरण सेवा योजनेचे योजना प्रमुख बोडखे सर यांनी प्रत्यक्ष कृतीची साथ दिली.
विद्यार्थ्यांनी हळद, बीट, मेहंदी व अरारूट पावडर वापरून रंग बनविले. यामध्ये हळदीपासून पिवळा, बीटापासून गुलाबी व मेहंदीपासून काळा रंग बनविले. विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेले रंग वापरून रंगपंचमी साजरी केली. यामध्ये विद्यार्थ्यांनी ओला व कोरडा असे दोन्हीही प्रकारचे रंग बनविले.
रंग खेळून झाल्यावर विद्यार्थ्यांनी चेहरापाण्याने स्वच्छधुतला यानंतर विद्यार्थ्यांच्या असे लक्षात आले कि नैसर्गिक रंग वापरल्यामुळे त्यांची त्वचा आणखीनच उजळली. नैसर्गिक रंगाचे दुष्परिणाम होत नसून त्याचा फायदाच आहे असे विद्यार्थ्यांना लक्षात आले, शिवाय रंग बनविण्यासाठी लागणारे साहित्य परिसरातूनच उपलब्ध होते.  नैसर्गिक
रंग स्वतः बनवून वापरण्याचा विद्यार्थ्यांना अनुभव व आनंद नवीनच होता.
विद्यार्थ्यांना सदर उपक्रमास मुख्याध्यापक इवरे व्ही.एल, योजना प्रमुख बोडखे बी.पी. यांचे मार्गदर्शन मिळाले.
Add caption
नैसर्गिक रंग बनविताना योजनेतील विद्यार्थी व योजना प्रमुख श्री. बोडखे बी.पी.
नैसर्गिक रंग खेळण्याचा मनमुरादपणे आनंद घेताना विद्यार्थी