Friday, 11 September 2020

 निसर्गातील विविध घटकांचे निरीक्षण हि पर्यावरण अभ्यासातील पहिली पायरी मानली जाते. आपल्या परिसरातील विविध घटकांचे आपण केलेले निरीक्षण हे आपले ज्ञान समृद्ध करणारे असते. याबाबतीत शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेले निरीक्षण हे त्यांची एखाद्या विशिष्ट घटकाबाबत समज विकसित करण्यास मदत करते.

पर्यावरण सेवा योजनेमध्ये सध्या विद्यार्थी घरीच राहून विविध घटकांचा अभ्यास करत आहेत. असाच एक अभ्यास अनुराधा ठोंबरे या लाल बहादूर शास्त्री विद्यालय सालसे, ता. करमाळा येथे इयत्ता ८ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने कीटकांबाबत केलेला आहे.

अनुराधाने फक्त निरीक्षणच केले नाही तर तिचा अनुभव छानरित्या शब्दबद्ध सुद्धा केलेला आहे. (अनुराधाने लिहिलेल्या अनुभवामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही.)

यत्ता ८ वीच्या विद्यार्थिनीने लिहिलेला अनुभव खरच वाचनीय आहे. सर्वांनी तो नक्की वाचवा.


माझा अनुभव

आपण प्रत्येक जीवाशी कसे गुंतत जातो, त्यांना कसा जीव लावतो, माया करतो याची जाणीव मला किटकांनी दिली.

आमच्या खिडकीच्या एका भागाला आम्ही बाग म्हणतो. त्यात उपयोगी झाडे आहेत. जसे पेरू, चिकू, आंबा. त्यातलाच एक कडीपत्ता. हिरवागार पातळ पानांचा नुसता तोडला तरी घमघमाट सुटतो असा. लागतील तशी त्याची चार पान तोडून आणली कि फोडणीचा खमंग वास येतो.

एकदा मी अशीच पान खुडायला गेले अन त्यावर मला कबुतराची विष्टा पडलेली दिसली. जरा मी निरखून पहिले आणि माझा संशय खरा ठरला हि विष्टा नसून एक फसवी छद्रम क्रिया आहे.

विष्टेसम दिसणारे एका फुलपाखराच्या अळ्या, ‘आता हे देखील आले नांदायला’ असा विचार केला आणि कडीपत्ता न खुडताच परतले. दर दिवशी माझ्या कडीपत्त्याच्या पाने फस्त होताना दिसत होती आणि आमची विष्टारुपी खादाड बाळ छान बाळस धरत होती. त्यांचा आकार तर वाढत होताच पण रंग हि बदल होता. पान खाऊन-खाऊन ते छान हिरव्यागार रंगाचे धष्ट-पुष्ट सुरवंट झाले होते. काही दिवसात ते सुस्तावले आणि कोशात जायची वेळ आली. रोजची त्यांची प्रगती बघतानाची मजा आता उत्सुकतेत बदलली. कोशात गेल्यावर मात्र बेचैनी वाढली. त्यातून कधी बाहेर पडेल फुलपाखरू?

रोज हे कोश जैसे थे. मोजून तेराव्या दिवशी कोश रिकामा झालेला मला दिसला. माझ्या न कळत फुलपाखरू उडून गेल होत. फारच वाईट वाटल. त्यामुळे झाल अस कि प्रत्येक कॉमन मॉरमॉन काळ, लाल फुलपाखरू हे आमच्या झाडावर जन्माला आलेल आमचच मित्र असावा अस वाटल.

सुरवंटांनी पान, शेंडे खाऊन-खाऊन कडीपत्त्याची जणू काही छाटणीच केली होती. परत नव्या जोमाने झाड बहरू लागली. फुलपाखरे अंडे घालण्यासाठी आगदी निवडक झाडावर येतात, मधुरस चोखायला मात्र त्यांना विविध तऱ्हेची फुल चालतात. आमच्या बागेत विविध फुले असल्यामुळे फुलपाखरे आकर्षित होतात.त्यात त्याचं आवडत झाड म्हणजे शेवंती. त्यात माझ आवडत फुलपाखरू हमखास येत. त्याची रंगसंगती इतकी न्यारी आहे कि मला ते पिवळी-केशरी, लाल-काळ्या रंगाचा ड्रेस घातल्यासारखा वाटतो. मोठे फुलपाखरच नव्हे तर इवलेसे पक्षीही येतात.

फुलपाखरांचे कमी भाईबंद पतंग बऱ्याचदा येतात. फुल्पाखारांसारखा यांचा रंग नाही. हे बागडायला येत नाहीत. शांतपणे बसायला येतात. आरामात बसलेल्या फुलपाखरांचे पंख दुमडलेले असतात. पतंगाचे उघडे असतात. त्यामुळे त्यांना छान निरखून बघता येत. निरीक्षण करता येत. पतंगाचे शरीर गुटगुटीत, पंख जास्त मखमली आणि त्यांचे अॅण्टेना पिसंसारखा असतो. पतंग जरी फिक्या रंगाचे असले तरी त्यांच्यावर नक्षीकाम अगदी देखण असत. पांढऱ्यावर काळे ठिपके, खाकी रंगावर चॉकलेटी रेषा, राखाडी आणि काळे अगदी एकाच रंगाचे असलेले. पिस्ता पतंग सुद्धा चकचकीत दिसतात.

मला वाटत कीटक निरीक्षणालाही खूप मजा आहे. कधी वाट चुकलेले भ्रमही येतात. मधमाशा तर येतातच. त्यांच्यातही बरीच विविधता दिसते. काही बारीकश्या तर काही भल्या मोठ्या. कधी चुकून घरात हि शिरतात आणि खिडकीच्या काचेवर आदळतात. हल्लीच एक कुंभारमाशी घर बांधायला आली. एक भिंत तिला पसंद पडली. आता तीच घर होईल. तिची पिल्ल येतील अशी वाट मी बघतेय.

मागच्या पावसाळ्याच्या सुमारास चतुराचा एक मोठा थवा खिडकीच्या बाहेर दिसला. चतुर तर नेहमीच दिसतात पण असा थवा मला पहिल्यांदाच दिसला होता. बराच वेळ ते आकाशात एकाच ठिकाणी उडत होते. लहानपणी मी एक जपानी गोष्ट ऐकली होती. त्यात लहान मुलांच रक्षण चतुर करत असताना आणि ती मुल त्यांचे कौतुक म्हणून गाणी गातात. माझे बाबा सांगतात चतुर कीटकांची शिकार करतात. ते आले कि डास कमी होतात. त्यामुळे लहानपणापासून मला चतुर आवडतात. असे चतुर बाहेर बघून मला आनंद झाला. अंधार पडला आणि ते दिसेनासे झाले आणि मी हि विसरून गेले. हे दिसून दोनच दिवस झाले असतील. मी खिडकीतल्या तुळशीपाशी उदबत्ती लावायला गेले तेवढ्यात कोपऱ्यात चिंचेच्या झाडाच्या फांदीवर एक नाही दोन नाही दहा-बारा चतुर झोपलेले दिसले. त्यांचे पातळ, पारदर्शक, नक्षीदार पंख पसरवून. उदबत्तीच्या धुराचा त्रास त्यांना नको म्हणून मी ती परत देवापाशी जाऊन लावली. दुसऱ्या दिवशी सकाळी बघायला गेले तर ते उडून गेलेले होते. परत येतील का नाही अशी धाकधूक होती, ते येवू लागले.

दिवसभर मला ते दिसायचे हवेत उडताना, तर कधी एकाच ठिकाणी घिरट्या घालताना तर कधी सूर मारताना. एखाद्याच निरीक्षण कराव म्हंटल तर अवघडच. त्यांच्या उडण्याचा काही नेमच नाही. कधी कसे वळतील याचा पत्ताच नाही आणि उडण्याचा वेग एवढा कि त्यांच्या गतीला माझी नजर फिरू शकत नाही. आणि एखादा एकाच ठिकाणी हेलिकॉप्टर सारख स्थिर म्हणाव तर क्षणार्धात बेपत्ता. त्यांची उडण्याची तऱ्हा, त्यांचे उडाण कौशल्य एवढ्या जवळून बघण्याची गंमत तर होतीच पण त्यात ते ‘आपले’ असल्याचा आवही होता. रोज संध्याकाळी मी त्यांची घरट्याकडे येण्याची वाट पाहत असते. तुळशीजवळ उदबत्ती लावण सोडून दिल. पण तुळशीपाशी जावून ‘आलात न रे बाबांनो’ अस म्हणायची प्रथा सुरु झाली. ते परत यायचे खरे पण त्यांची संख्या रोडावत होती.

पहिल्यांदा दाटीने बसणारे चतुर आता विरळ होताना दिसत होते. दहा-बारांचे पाच-सहा झाले. अस होत होत दोघेच उरले. एके दिवशी एकच परतला. आता मात्र माझी तंतरली. काय कराव? त्याला घरात दामटून हि ठेवता येत नव्हत. त्यानंतर ज्याची भीती होती तेच घडल. तो हि परत नाही आला.

आकाशात राहायला गेलेले पक्षी, झाड, निसर्ग हे सोबत राहायला आलेत. यांची सोबत अंगवळणी पडत होतीच कि फुलपाखर. पतंग, चतुर हे हि राहायला आलेत. ते नेहमी प्रमाणे आले नाहीत कि जीव धास्तावयचा.

लेकीची जशी आई घरी यायची वाट पाहते तशी मी त्यांची पाहते.


विद्यार्थिनी – अनुराधा ठोंबरे
इयत्ता – ८ वी
मार्गदर्शक – श्री गणेश सातव सर.




उपक्रमाचे नाव- पाणी (वाटर) ऑडिट- नाशिक विभाग

कोविड-१९ साथीच्या रोगाच्या प्रदुर्भावाच्या कालावधीत विद्यार्थ्यांना पर्यावरण सेवा योजनेंतर्गत सर्व कृती उपक्रम घरगुती पातळीवर राबवित जात आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी घरातील गळक्या नळांचे-पाणी गळती बाबत ऑडिट केले आहे. ते कश्या पद्धतीने करायचे याबाबत महितीपत्रके / संसाधन / ई-लर्निंग साहित्य व्हाटस अप ग्रुप च्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यात आले.

साहित्य- मोजपात्र (एम.एल) किंवा औषधाच्या बाटलीचे झाकण जे ५ एम.एल चे असते, घड्याळ, स्टॉप वॉच, नोंदवही इ.

कृती- घरातील एकूण नळ किती, तसेच त्यापैकी किती नळ गळके आहेत याचा अभ्यास केला आहे.तसेच त्यांचे थेंब थेंब पाणी किती मिनिटात किती एम.एल गळते याबाबत मोजमाप विद्यार्थ्यांनी मोजपात्रात केले आहे. त्यावरून एका मिनिटाचे, एका तासाचे, एका दिवसाचे आणि एका महिन्याचे तसेच एक वर्षाचे किती पाणी वाया जाते याबाबत गणितीय आकडेमोड अभ्यास करून व्हाट्स अप ग्रुप वर माहिती विद्यार्थ्यांनी शेयर केले आहे.
याचा पुढील टप्पा म्हणजे पाणी गळती बंद करण्यासाठी विद्यार्थी काय उपाययोजना करतील म्हणजे नळ बदलवणे किंवा त्याला पर्याय काय जसे एम.सील किंवा रबर गुंडाळणे किंवा इतर काय नाविन्यपूर्ण उपाययोजना करीत आहे.
या कृतीमुळे पाण्याची थेंब थेंब वाचेल व वर्षभर नळ गळती होण्यापासून थांबवली जाईल. तसेच पाणी घरापर्यंत आल्यानंतर त्याला टाकीत चढवण्यासाठी लागणारी वीज / इलेक्ट्रिसिटी सुद्धा वाचवली असेल,
विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प म्हणजे पर्यावरण संवर्धनासाठी केलेला चेंज (बदल) प्रोजेक्ट ठरेल.

धन्यवाद...

जगदीश ठाकूर
प्रकल्पअधिकारी, पर्यावरण सेवा योजना
नाशिक विभाग.












Thursday, 10 September 2020


अभ्यासातून संवर्धनाकडे

एखाद्या घटकाची आवड जो पर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत आपण त्या घटकाच्या मुळाशी जावून त्याचा अभ्यास करत नाही. असच काहीसे सध्या विद्यार्थ्यांचे फुलपाखरू या घटकाबद्दल झाल आहे.

आपल्या सभोवताली खूप सारे फुलपाखरे आपल्याला पहायला मिळतात. रंगेबेरंगी फुलपाखरे या फुलावरून त्या फुलावर बागडताना पाहण्याचा आनंद निराळाच आहे. यातही लहानपणी आपल्याला फुलपाखरे पकडायला आणि त्यांचा रंग आपल्या हाताला कसा लागतो हे पहायला खूप आवडते.

पण लाल बहादूर शास्त्री विद्यालय सालसे, ता. करमाळा येथील इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा याबाबत अनुभव जरा वेगळा आहे. सध्या घरी बसून काय करायचे हा विद्यार्थ्यांसमोर खूप मोठा प्रश्न होता. यामुळे योजने अंतर्गत आपल्या परिसरातील जैवविविधतेमधील घटकांचा अभ्यास करायचे निश्चित करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या परिसरातील झाडे, पक्षी व फुलपाखरांचे निरीक्षण व नोंद करण्याचा उपक्रम सुरु केला.

या काळात विद्यार्थ्यांना फुलपाखरू या घटकाबद्दल विशेष आवड निर्माण झालेली पहायला मिळाली. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी त्यांच्या परिसरातील फुलपाखरांचे निरीक्षण करण्यास सुरुवात केली. निरीक्षणा बरोबरच विद्यार्थ्यांनी नोंदी हि ठेवायला सुरुवात केली. यामध्ये विद्यार्थ्यांनी फुलपाखराचे अंडे, अळी व कोश यांचे ही निरीक्षण व नोंदी ठेवायला सुरुवात केली. निरीक्षणामुळे विद्यार्थ्यांना बारकावे समजण्यास मदत झाली.

विद्यार्थ्यांचे निरीक्षण सुरु असतानाच व्हाटसअॅप गृपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना फुलपाखराचे शरीर रचना, जीवनचक्र याबाबत मार्गदर्शन केले जात होते. आता विद्यार्थी फुलपाखरांचे जमेल तसे फोटो काढून ते ओळखण्यासाठी गृपवरती पोस्ट करत होते. विद्यार्थ्यांना फुलपाखरू कसे ओळखावे याबाबत हि मार्गदर्शन केले जात होते.

आता विद्यार्थ्यांनी हळूहळू फुलपाखरू कोणत्या झाडावर रस पिण्यासाठी येते, कोणत्या झाडावर अंडे घालते याबाबत निरीक्षण, नोंदी व अभ्यास करायला सुरुवात केली होती. याचबरोबर त्यांना कशापासून धोका आहे याची हि नोंद विद्यार्थी ठेवत होते.

गेल्या ३ महिन्यापासून विद्यार्थी सातत्याने फुलपाखराचा सविस्तर अभ्यास करत आहेत. फुलपाखराचे आपल्या पर्यावरणातील महत्त्व विद्यार्थ्यांना पूर्णपणे समजलेले आहे. यामुळे हे विद्यार्थी फुलपाखरांसाठी आवश्यक असलेले खाद्य वनस्पती व मधुरस पिण्यासाठी योग्य अशा झाडांच्या बिया संकलित करत आहे. भविष्यात या बियांचे रोपे तयार करून फुलपाखरांना पूरक असे वातावरण तयार करण्याचा विद्यार्थ्यांचा मानस आहे.

कोणतेही काम वरवरचे न करता त्याच्या मुळाशी जावून ते पूर्णपणे समजावून घेतले तर त्यामध्ये मनापासून काम करता येते. या चिमुकल्या हातांनी आता फुलपाखरांचे संवर्धन करण्याचे निश्चित केले आहे आणि त्यात त्यांना नक्कीच यश मिळेल.     

 

गणेश सातव

पुणे विभाग समन्वयक

पर्यावरण सेवा योजना


विद्यार्थ्यांनी अळी, कोश व फुलपाखराचे काढलेले फोटो.

Wednesday, 29 July 2020

कोविड-१९- ई-लर्निंग- बीज संकलन आणि रोपवाटिका-नाशिक विभाग

कोविड -१९ साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव सर्वदूर आहे. त्याचा परिणाम अध्यापन प्रक्रियेवर झाला आहे. या अनुषंगाने शासन स्तरावर ऑनलाईन ई-लर्निंग/ डिस्टन्स मोड च्या आधारे अध्यापनाची प्रक्रिया करणेबाबत विचार विनिमय सुरू होता.त्यानुषंगाने विद्यार्थ्यांनी घरगुती पातळीवर बीज संकलन केले आहे.ज्यामध्ये स्थानिक प्रजातीच्या विविध बिया संकलित केल्या आहेत.
उद्देश : कोविड-१९ साथ रोग प्रादुर्भावाच्या काळात पर्यावरण सेवा उपक्रम राबविण्यासाठी अद्यावत प्रगत ऑनलाईन अध्यापन पद्धती विकसित करून नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत कृती उपक्रम पोहचविणे व त्यातून कृतियुक्त अध्यापन राबिण्याची कार्यक्षमता (competencies) विद्यार्थांमध्ये विकसित करणे व योजनेसंदर्भात नियोजन व अध्यापन प्रक्रिया पुढील काही महिने ऑनलाईन पद्धतीने राबविणे हा उद्देश आहे.
विभागातील विद्यार्थ्यांचे व्हाटस अप ग्रुप तयार केले आहे व त्यानुसार विद्यार्थ्यांचे व्हाट्स अप गृप तयार करून योजनेसंदर्भात नियोजन सदर कोविड-१९ च्या प्रादुर्भावात पुढील काही महिने ऑनलाईन पद्धतीने केले जात आहे.ज्यामध्ये योजना प्रमुख शिक्षक व मुख्याध्यापक व योजना प्रमुख हे व्हाटस अप चे ग्रुप अॅडमीन आहेत व त्याबाबत नियंत्रण व समन्वय घडवून आणण्याचे कार्य करित आहे. तसेच या ग्रुप मध्ये संसाधन साहित्य, कृती आराखडे, पोस्टर, बॅनर, माहितीपत्रके नवीन सूचना विभागाचे प्रकल्प अधिकारी यांच्याद्वारे वेळोवेळी अद्यावत केले जात आहे.
२६ जून-२०२० ते २२ जुलै-२०२० दरम्यान विद्यार्थ्यांनी परिसरात आढळणारे व स्थानिक प्रजातीचे देशी बीज/ गावठी बीज एकूण संख्या २२४६७ इतके संकलित केले आहे. ज्यापासून पुढे रोपांची निर्मिती करण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे.
शाळेनिहाय बीज संकलन व रोपवाटीकेचे बाबत माहितीचे फोटो पहावे.







पुढील नियोजन-  वर्ष-२०२०-२१ हे जून-२०२० पासून शैक्षणिक वर्ष म्हणून शासन निर्णयानुसार सुरुवात झाली आहे, परंतु कोविड-१९ सारख्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव हे जगातिक संकट निर्माण झाले. परंतु या सर्व संकटावर मात करत योजनेचे कामकाज ऑनलाईन- डीस्टन्स मोड ने सुरु करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त स्थानिक प्रजातींच्या (देशी/गावरण/गावठी) बियांचे संकलन करून
१.बीज संकलन
२.बीज प्रक्रिया
३.रोपवाटिका तयार करणे.
या टप्प्याने पुढे जाऊन जास्तीत जास्त स्थानिक प्रजातीच्या रोपांची रोपवाटिका तयार करण्याबाबत  नियोजन केले गेले आहे.
विद्यार्थ्यांना अश्या प्रकारचे उपक्रम पर्यावरण सेवा योजनेच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण देणारे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कौशल्य आणि स्वनिर्मितीचा आनंद घेता येतो.
सदर कोविड-१९ च्या कालावधीत विद्यार्थ्यांनी घरगुती पातळीवर असे उपक्रम राबविल्याने आनंददाई शिक्षणाची अनुभूती मिळण्यास नक्कीच मदत होत आहे.
धन्यवाद...

जगदीश ठाकूर
प्रकल्प अधिकारी, नाशिक विभाग

पर्यावरण सेवा योजना

Tuesday, 7 August 2018

अवर सचिव, पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन यांनी घेतला पर्यावरण सेवा योजनेतील शाळेंचा आढावा.

 
 पर्यावरण विभाग पुरस्कृत, पर्यावरण सेवा योजना अंतर्गत,
यु.एन.इ.पी (United Nations Environment Program)  ने २०१८ ला ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी  साठी ‘Beat Plastic Pollution’ या विषयांतर्गत भारताला यजमानपद मिळाले असून त्याबाबत संपूर्ण जगाला प्रतिनिधित्व केले आहे,याच अनुषंगाने मा.अवर सचिव, श्री. संजयजी संदनशिवे, पर्यावरण विभाग,महाराष्ट्र शासन यांनी आदर्श विद्यालय वरोडा, पो. ब्राम्हणी, ता. कळमेश्वर, जि. नागपूर या शाळेला दि.१७ जुलै २०१८ रोजी विशेष भेट देऊन नागपूर आणि अमरावती विभागातील शिक्षकांसाठी प्लॅस्टिक मुक्त शाळा व गाव परिसर या विषयांतर्गत एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेचे उद्घाटन मा. अवर सचिवांच्या हस्ते सरस्वतीच्या मूर्तीची पूजा व दीप प्रज्वलन करून झाले.यामध्ये लोकसमुदायाबरोबर काम करताना प्लॅस्टिक कचरा आणि त्याचे धोके,त्याचे व्यवस्थापन आणि विल्लेवाट,प्लॅस्टिक बंदीबाबत शासनाची भूमिका,शासनाने निर्गमित केलेला शासन निर्णय (जी.आर) तसेच कोणकोणत्या प्रकारच्या प्लॅस्टिक पिशव्या आणि वस्तूंवर बंदी आहे याबाबत सविस्तर माहिती दिली.प्लॅस्टिक बंदी हि जोपर्यंत लोकचळवळ होत नाही तोपर्यंत प्लॅस्टिक बंदी शक्य नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. प्लॅस्टिक व थर्माकोल बंदीचा महाराष्ट्र शासनाचे प्लॅस्टिक बंदी विषयी माहिती साठी पर्यावरण शिक्षण केंद्र पुणे मार्फत तयार केलेली प्लॅस्टिक विषयक हस्तपुस्तिका योजना प्रमुखांना देण्यात आले.
            पर्यावरण सेवा योजनेला सात वर्ष पूर्ण झाले असून सद्यस्थितीला संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यावरण सेवा योजनेतील शाळा व गाव परिसरात विविध नाविन्यपूर्ण कृती उपक्रम राबविण्यात आले आहे. सदर उपक्रमांची दखल घेत श्री. संजयजी संदनशिवे यांनी योजनेच्या उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी आदर्श मानकर विद्यालयास या शाळेला भेट देवून योजने अंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला.विद्यार्थ्यांनी गट निहाय मा. अवर सचिवांसमोर सादरीकरण केले. प्रथम विद्यार्थी गटाने पर्जन्यमापक यंत्र,पर्जन्य नोंदी, सर्वात जास्त आणि कमी पडलेला पाऊस याबाबत माहिती दिली.पर्जन्यमापकाच्या विविध भागाची शास्त्रीय माहिती ऐकून मा. अवर सचिवांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. दुसऱ्या गटाने निर्माल्यापासून खत तयार करणे गणेश मंडळाकडून निर्माल्या संकलन, तिसऱ्या गटाने शाळा परिसरात तयार केलेल्या रोपवाटिकेबाबत विद्यार्थ्यांनी बीज संकलन, बीज साठवणूक, बीज प्रक्रिया,उगवण क्षमता अभ्यासणे, नोंदी याबाबत सादरीकरण केले.चौथ्या गटाने शाळा परिसरात गांडूळ खत प्रकल्प सादरीकरण केले, यामध्ये गांडूळ खताच्या बेडबाबत शेण व पालापाचोळ्याचा थर,कोणत्या जातीचे गांडूळ वापरले आहे याबाबत सादरीकरण केले. कमी खर्चात तयार होत असलेला गांडूळ खत उपक्रम पाहून मा. अवर सचिवांनी शाळेचे व विद्यार्थ्यांची कौतुक केले. कार्यशाळेच्या ठिकाणी योजने अंतर्गत नागपूर व अमरावती विभागातील शाळांनी राबविलेल्या उपक्रमांची प्रदर्शनी भरविण्यात आली होती.माहिती मॉडेल, अहवाल, कंपोस्ट खत, टाकावू पासून टिकावू वस्तू, बीज संकलन, गाव स्तरावर राबविलेल्या उपक्रमाचे अहवाल व फोटो, शिक्षकांचे मासिक अहवाल, शाळानिहाय फाईल, माल साठा नोंदवही यांचा समावेश होता.
            नागपूर व अमरावती विभागातील निवडक ७ योजनाप्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.त्यांच्या शाळेमध्ये घेतलेल्या उपक्रमाचा अहवाल, छायाचित्र, गाव पर्यावरण सद्य स्थिती अहवाल, टाकाऊ वस्तू पासून बनविलेल्या वस्तू,उपक्रम नोंद वही पुस्तिका व मालसाठा नोंद वही, शाळा व गाव परिसरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती व टप्पे याबाबत योजना प्रमुखांनी सविस्तर माहिती अवर सचिवांना दिली. योजनेत सहभाग झाल्यापासून विद्यार्थी व शिक्षक म्हणून झालेल्या सकारात्मक बदलाबाबत माहिती दिली. गावाच्या माजी सरपंच श्रीमती.कल्पना डाखोळे यांनी योजना गाव परिसरात राबविल्यामुळे गावकऱ्यांमध्ये झालेल्या बदलाची माहिती दिली. यामध्ये अवर सचिवांनी मुख्याध्यापक, योजना प्रमुख व माजी सरपंचांशी चर्चा करून योजना शाळा व गाव स्तरावर कशा प्रकारे राबविली जाते याची माहिती घेतली.शिक्षकांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या,शासन स्तारावर त्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असा विश्वास दिला. पर्यावरण सेवा योजनेचे उपक्रम अंमलबजावणीसाठी प्रोत्साहन दिले.
            कार्यक्रमाची सांगता मा. अवर सचिवांच्या हस्ते शाळा परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आली.सदर कार्यशाळेसाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मानकर यांनी कार्यशाळा आयोजित करून सहकार्य केले. योजना प्रमुख श्रीमती. अनिता तोमर यांनी कार्यशाळेचे व्यवस्थापन केले,शाळेचे सहशिक्षक,विद्यार्थांनी मोलाचे योगदान दिले,सूत्र संचालन श्री.पडोळे यांनी केले.नागपूर विभागाचे समन्वयक श्री.भिमाशंकर ढाले यांनी कार्यक्रम घडवून आणला, पुणे विभागचे समन्वयक श्री.गणेश सातव यांनी नियोजन आणि समन्वयन केले,अमरावती विभागाच्या समन्वयिका केतकी पाटील यांनी व्यवस्थापन केले.श्रीमती.अनिता तोमर यांनी आभार मानले.
  
  • पर्जन्यमापकाद्वारे पाऊस मोजण्याचा उपक्रम मा.संजय संदानशिवे अवर सचिव , पर्यावरण विभाग यांना दाखविताना विद्यार्थी,शिक्षक
मा. सचिवांना गांडूळखत प्रक्रिया सांगताना विद्यार्थी
नागपूर विभागातील शाळेच्या उपक्रम फाईल व तयार करण्यात आलेल्या वस्तू पाहताना मा. सचिव व योजना प्रमुख श्रीमती तोमर मॅडम

 
शालेय उपक्रमाविषयी माहिती देताना योजना श्री. इंगळे सर
 
नागपूर व अमरावती विभागातील शिक्षांकाना मार्गदर्शन व त्याच्या योजनेविषयीच्या अडचणी समजून घेताना मा. सचिव सर
वृक्षारोपण करताना मा. अवर सचिव श्री. संजय संदनशिवे सर
           

Wednesday, 9 May 2018

नाशिक विभाग- दोन दिवसीय अनिवासी शिबीर_श्रीमती ब.गो.शानबाग विद्यालय,सावखेडा ता.जि.जळगाव



शाळेचे नाव- श्रीमती ब.गो.शानबाग विद्यालय,सावखेडा ता.जि.जळगाव
शिबिराचा मुख्य विषय- घनकचरा वर्गीकरण आणि व्यवस्थापन
दिनांक- ०५-०३-२०१८ आणि ०६-०३-२०१८
शिबिराचे गाव-वैजनाथ ता.एरंडोल जि.जळगाव
पहिला दिवस:- ०५-०३-२०१८
पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन पुरस्कृत पर्यावरण सेवा योजने अंतर्गत शाळा आणि समुदाय पातळीवर दोन दिवसीय अनिवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिराला ३८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला,सकाळी ठीक १० वा. शिबिराला सुरुवात झाली,हजेरी घेण्यात आली.शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी श्री.विठ्ठल श्रावण गायकवाड,उपसरपंच श्री.नाना नवल पाटील,ग्रामपंचायत सदस्य, योजनाप्रमुख श्री जितेंद्र पाटील आणि श्री.बडगुजर,,प्रकल्प अधिकारी जगदीश ठाकूर नाशिक विभाग हे उपस्थित होते.
            नाशिक विभागाचे विभाग समन्वयक जगदीश ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना शिबिराचा उद्देश आणि रूपरेषा समजावून सांगितली,विद्यार्थ्यांचे गट पाडून देण्यात आले,विद्यार्थी हे ग्रामपंचायत कार्यालय जवळ एकत्र जमले त्यानंतर वैजनाथ गावात सर्व विद्यार्थी गावामध्ये प्रभात फेरीसाठी गावाकडे रवाना झाले.प्रभातफेरी द्वारे गावात जनागृती हा उद्देश होता.कचरा वर्गीकरण बाबत (स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे; कचरा कुंडिचा वापर करू,सुंदर परिसर निर्माण करू; स्वच्छ घर, सुंदर परिसर,कचरा कुंडीचा करुया वापर; स्वच्छ सुंदर परिसर, जीवन निरोगी निरंतर;ई कचरा आरोग्यास खतरा; कुजणारा आणि न कुजणारा कचरा वेगळा करा, निसर्गाच्या नियमांचे पालन करा इ) घोषणा देण्यात आल्या,घोषणा फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या.गावातील जमा होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याचे शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट व्हावे कुटुंबाना कुजणारा आणि न-कुजणारा कचरा वर्गीकरण व्हावा यासाठी प्रत्येकी २ खोके असे एकूण ५० खोके कुटुंबाना वाटप करण्यात आले.गावातील कचरा टाकण्याचे ठिकाणे-उकिरडे,कचरा डेपो या बाबत गावाचा कचरा संदर्भात नकाशा काढण्यात आला.ज्यामध्ये गावातील उकिरडे,कचरा टाकण्याची ठिकाणे,विद्यार्थ्यांनी प्रश्नावली च्या सहाय्याने कचरा विल्हेवाट बाबत गावाची सद्य स्थिती जाणून घेण्यासाठी श्री. श्री.नाना नवल पाटील यांना प्रश्न विचारले (सोबत प्रश्नावली आणि विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न उत्तर जोडले आहे) त्यामध्ये सध्या कचरा गोळा करण्यासाठी पद्धती,कचरा पेटी,कचरा टाकण्याची ठिकाणे,निधी इ.
            गावामध्ये प्रभातफेरी,जनजागृती झाल्यानंतर सर्व विद्याथी ग्रामपंचायत कार्यालय जवळ सावलीत एकत्र जमा झाले,काही काळ विश्राम झाल्यावर गावामधील महत्वाचे ठिकाणे ग्रामपंचायत फळा,महत्वाचे चौक,प्राथमिक शाळा, इ.ठिकाणे प्लॉस्टिक,ई-कचरा,कुजणारा आणि न-कुजणारा कचरा याबाबत माहितीपत्रके चिटकविण्यात आले.शाळेत परत आल्यावर विद्यार्थ्यांनी जेवण केले,त्यानंतर गावाचा नकाशा,ग्रामपंचायत प्रश्नावली आणि इतर उर्वरित कामे पूर्ण करण्यात आले.आलेले अनुभव एकमेकांना सांगितले, दुसऱ्या दिवसाचे नियोजन करण्यात आले,अश्या प्रकारे शिबिराचा पहिला दिवस पार पडला.

दुसरा दिवस- ०६-०३-२०१८
दुसऱ्या दिवशी वैजनाथ गावात विद्यार्थी सकाळी ८:०० वा. उपस्थित झाले,हजेरीघेण्यात आली,ग्रामपंचायत जवळ एकत्र झाल्यावर विद्यार्थिनिनी गावातील महिला आणि विद्यार्थ्यांनी पुरुष मंडळीना कार्यक्रमासाठी पुनश्च निमंत्रित करण्यात आले.कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच श्री.विठ्ठल श्रावण गायकवाड,उपसरपंच श्री.नाना नवल पाटील,ग्रामपंचायत सदस्य,योजना प्रमुख शिक्षक,विद्यार्थीनिनी गावातील नागरिकांना  एकत्र करून कचरा आणि प्लास्टिक प्रश्न सोडवण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली.त्यामध्ये स्वच्छता या विषयी  नाटिका सादर करण्यात आली,नागरिकांना  कचरा वर्गीकरण हा विषय खेळाच्या माध्यमातून समजण्यासाठी प्रकल्प अधिकारी जगदीश ठाकूर यांनी ‘कचरा वर्गीकरण’ खेळ घेतला यामध्ये भाज्यांचे देठ,फळांचेसाल,प्लॅस्टिक,कापड,लोखंड,थर्माकॉल,ई-कचरा,जैववैद्यकीय कचरा,कागद यासारखे मिश्र कचरा टाकण्यात आला आणि त्याचे वर्गीकरण करण्याबाबत नागरिकांसोबत प्रात्यक्षिक घेण्यात आले,या माध्यमातून घरामध्ये कचरा कश्या पद्धतीने वेगळा करायचा याबाबत माहिती दिली,प्लास्टिक,इलेक्ट्रोनिक कचरा,जैववैद्यकीय या कचऱ्याची वर्गवारी करण्याबाबत आवाहन करण्यात आले.

            सागर मित्र अभियान चे प्रतिनिधी श्री.विशाल सोनकुल  यांनी सागर मित्र अभियान बाबत माहिती दिली तसेच प्लास्टिक चे मानव आणि निसर्ग यांवर होणारे गंभीर परिणाम,समुद्रातील जलचर यांच्यावर होणारा परिणाम याबाबत गांभीर्य विद्यार्थी आणि नागरिकांना पटवून दिले,तसेच गावातील प्लास्टिक हे इतरत्र न फेकता गावामध्ये एक “सागर मित्र बॅग” ग्रामपंचायत कार्यालय जवळ लावण्यात आली, बाजाराला प्लॅस्टिक पिशवी न वापरता कापडी पिशवी वापरावी,याचे उद्घाटन सरपंच आणि ग्रामस्त यांच्या हस्ते करण्यात आले.ज्यामध्ये प्लास्टिक पिशव्या रॅपर्स जमा केले जाईल आणि हि प्लास्टिक बॅग भरल्यानंतर जळगाव येथील नेहा रिसायकलिंग एजन्सी ला सुपूर्त करण्यात येईल,जेणेकरून गावातील प्लास्टिक समस्या सोडवण्यास नक्कीच मदत होईल,तसेच प्लास्टिक वापर कमी आणि कापडी पिशवी जास्तीत जास्त वापरावी याबाबत आवाहान करण्यात आले.अश्या पद्धतीने दोन दिवसीय अनिवासी शिबीर पार पडले. 
गावकऱ्यासमोर स्वच्छ गाव नाटिका सादर करताना विद्यार्थी
 
घनकचरा वर्गीकरण खेळाच्या माध्यमातून समजावून सांगताना विभाग समन्वयक

वैजनाथ गावातील प्लास्टिक पिशवी संकलन साठी सागर मित्र ची  बॅॅग लावण्यात आली आहे.


Tuesday, 20 February 2018

जनता विद्यालय टेंभे(वरचे) ता.बागलाण जि. नाशिक पाणी शिबीर बातमी

जनता विद्यालय टेंभे(वरचे) ता.बागलाण जि. नाशिक
पाणी शिबीर बातमी
लोकसत्ता- नाशिक
दिनांक-१५-०२-२०१८