आयुर्वेदीक वनस्पती लागवड व त्यांची
उत्पादने तयार करणे
आदिमानवाच्या
काळापासून मानव जंगलातील शिकारीबरोबर वनस्पतीकडे लक्ष देऊ लागला.
निसर्गचक्राप्रमाणे निरनिराळ्या वनस्पतींचे रूजणे, वाढणे,
फुले व फळे येणे आणि परत बियांपासून त्यांचे पुनरूत्पादन होणे,
याचे निरीक्षण केले. निरनिराळ्या वनस्पतींची चव, रूची, ठराविक वनस्पती खाल्ल्याने होणारा परिणाम हेही
त्याने अनुभवले. त्या अनुभवाच्या व निरीक्षणाच्या साह्याने त्याने वनस्पतींचे
वर्गीकरण केले,यावर आधारित अनुभवी
माणसांची परंपरा तयार होऊ लागली. वनस्पतींमध्ये ताकद देण्याची, वाढविण्याची क्षमता आहे, रोगनिवारण, वेदनाशमन इ. वैद्यकीय उद्देशांकरिता वापरण्यात येणाऱ्या वनस्पती दिव्य
औषधी वनस्पती आहेत, ह्याचे त्याला ज्ञान झाले.या वनस्पतींच्या निरनिराळ्या भागांपासून (उदा.पाने, मुळे, खोड इ.)
तयार केलेले काढे, अर्क,लेप क्रियाशील रासायनिक
द्रव्ये इ. स्वरूपांत या वनस्पतींचा उपयोग केला जातो.
भारतीय ऋषि-मुनींनी प्राचीन काळापासून
अनुभवसिद्ध हमखास गुण देणाऱ्या व भारतातील हवामानात चांगल्या रीतीने वाढणाऱ्या वनस्पतींचे जतन केले. त्यांची वर्णने व उपयोग ह्यांच्या सूत्रबद्ध रचना
केल्या. ऋग्वेद,
आयुर्वेद व त्यानंतर चरकांचा कालखंड ह्या काळात औषधींविषयक माहितीचा आणखी आविष्कार
होत गेला. चरक व सुश्रुत ह्यांचा कालखंड तर वनौषधींचा सुवर्ण काळ म्हटला पाहिजे.(मराठी
विश्वकोश)
चरकसंहितेमध्ये
(मराठी विश्वकोश) ७०० च्या वर औषधी वनस्पतींची माहिती दिली आहे. इ.
स. दुसऱ्या शतकातील ह्या ग्रंथामध्ये वनौषधी व त्यांचे उपयोग इतकेच नाही, तर वनस्पती कशा ओळखाव्यात, केव्हा व कशा रीतीने गोळा
कराव्यात, ह्याची देखील नोंद केली गेली आहे.
वैद्यकशास्त्राचा ‘औषधी विद्या’ नावाचा एक मुख्य भाग आहे. त्यात औषधीचे
वर्णन व औषधी योजना असे दोन पोट विभाग आहेत. औषधी वर्णनात झाडे ओळखणे, त्यांची उत्पत्ती व कोणता भाग वापरावयाचा ह्याचा समावेश आहे. औषधींचे रंग,
आकार, विशिष्ट गुण इ. समजावून घेणे महत्त्वाचे
आहे. औषधी योजनेत शरीराचे निरनिराळे भाग आणि त्यांवर विशिष्ट औषधींचा होणारा
परिणाम व त्यायोगे त्या कोणत्या रोगात कशा प्रकारे वापरावयाच्या हे महत्त्वाचे
आहे.
महाराष्ट्र शासन
पर्यावरण विभाग पुरस्कृत पर्यावरण सेवा योजने अंतर्गत जनता विद्यालय कोऱ्हाटे
ता.दिंडोरी जि. नाशिक हि शाळा थोडी उंच टेकडीवर असून खडकाळ जमीन आहे. शाळेतील ५० विद्यार्थी व योजनाप्रमुख
श्री.चव्हाण वाय.एस. यांनी शाळेचा मुख्य उपक्रम “ आयुर्वेदिक वनस्पती लागवड ” हा निवडला आहे. गावात जास्तीत जास्त आयुर्वेदिक
वनस्पतींचा प्रसार व्हावा या उद्देशाने तसेच स्थानिक लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी
म्हणून गावात सर्वेक्षण करून आयुर्वेदिक वनस्पती लागवड करण्याचा निर्णय घेण्यात
आला.