Tuesday, 10 June 2014

पाणी व मृदा संवर्धनाकरीता शाळेच्या परिसरात खंडीत समतल चर खोदणे.


शाळेचे नाव – सुमति बालवन, गुजर-निंबाळकरवाडी, कात्रज, पुणे

पृथ्वीवरील सजीवांच्या अस्तित्वासाठी  असणाऱ्या आवश्यक घटकांपैकी पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पृथ्वीच्या एकूण क्षेत्रापैकी ७१ टक्के पाणी व २९ टक्के भूभागाने व्यापलेला आहे. या ७१ टक्के उपलब्ध पाण्यामध्ये समुद्रातील पाण्याचा वाटा ९६.५ टक्के आहे. म्हणजेच ३.५ टक्के पाणी पिण्यायोग्य आहे, या ३.५ टक्क्यातील १.७४ टक्के पाणी बर्फाच्या स्वरुपात आहे. उर्वरित १.७६ टक्के पाणी पिण्याकरिता नदी, तलाव, विहीर इ. मध्ये उपलब्ध आहे.
सध्याच्या काळात बदलत्या ऋतू चक्रामुळे पाण्याचे दुर्भिक्ष तीव्रपणे जाणवत आहे. महाराष्ट्रातील मान्सून हा लहरी आहे. १२० दिवसाच्या पावसाळ्यात सरासरी तीस दिवसात भरपूर पाऊस पडतो व इतर दिवस कोरडेच जातात. त्यामुळे पाणी संवर्धन हि काळाची गरज बनली आहे.
सुमति बालवन शाळा पुणे शहरापासून जवळच असलेल्या कात्रज परिसरात गुजर-निंबाळकरवाडी येथे आहे. सदर शाळा एका छोट्याश्या डोंगरावर वसलेली आहे. शाळा गावापासून उंचीवर वसलेली असल्यामुळे पाण्याचे टंचाई जाणवते. कात्रज परिसरामध्ये सरासरी ८७३ मिमी पाऊस पडतो. परंतु यापैकी बहुतांशी पाणी परिसरातील असलेल्या डोंगर व टेकड्याच्या तीव्र उतारावरून वाहून जाते. अशीच परिस्थिती सुमति बालवनच्या परिसरात आहे. शाळेने या सर्व भौगोलिक बाबींचा अभ्यास करून पावसाच्या पाण्याचे संकलन करण्याचा उपक्रम राबविला आहे. यामधून शाळेतील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजेकारिता पाणी उपलब्ध होते. परंतु शाळेच्या परिसरात लावलेल्या झाडांना वर्षातील फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे महिन्यात पाणी मिळू शकत नाही.
सदर समस्येवर उपाययोजना करण्याकरिता शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता गुळूमकर, योजनाप्रमुख सोनाली बगाडे व पर्यावरण सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक गणेश सातव व भीमाशंकर ढाले यांनी चर्चा केली. चर्चेअंती असा निष्कर्ष निघाला कि शाळेच्या परिसरात चर खांदाव्यात. नागपूर विभागाचे जिल्हा समन्वयक भीमाशंकर ढाले यांनी शाळेच्या परिसरातील जमिनीचा उतार मोजमाप केला असता तो ७ ते ८ टक्के भरला त्या आधारे तसेच स्थानिक पर्जन्यमान, मातीचा प्रकार या आधारावर खंडित  समतल चर तयार करण्यासाठी जागेची निवड अभ्यास केला व खंडीत समतल चर खांद्ण्याची शिफारस केली.
खंडीत समतल चरीचे मुख्य कार्य –
1.      पाण्याची मुरवण करणे
2.      पाण्याचा गतिरोध
3.      पाण्याचा अपधावेध कपात
4.      मृद् – आद्रता वृद्धी
5.      मातीच्या धुपेस आळा.
खंडित समतल चर खोदान्याकरिता आवशक्य असणारी “ A” फ्रेम  विध्यार्थ्यांच्या मदतीने तयार करण्यात आली. तत्पूर्वी “ A” फ्रेम  चा उपयोग विद्यार्थ्यांना जमिनीची समांतर उतार शोधण्यासाठी उपयोग होतो व त्याची गरज समजावून दिली. तसेच मजुरांना “ A” फ्रेम चा उपयोग करून रेखांकन करून दाखवले. खंडित उतार हा विच्छेदित उतार, कमी उतार कमी ते मध्यम उतार अशा भूभागावर केला जातो याची प्रत्यक्षासहित माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. सदर चर ह्या  ४ x ०.६० x ०.४५ मी.  लांबीच्या खोदण्याच्या सूचना करण्यात आल्या.
प्रथमतःविद्यार्थ्यांच्या हातात “ A” फ्रेम देवून समांतर उतार शोधण्यास  व त्यानुसार रेखांकन करण्यास सांगितले. त्याचबरोबर चर खांदत असताना घ्यावयाच्या काळजी बाबतही प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन करण्यात आले. दिलेल्या सूचनेनुसार विद्यार्थी व मजुरांनी चर खोद्ल्याच्या शाळा भेटी दरम्यान निदर्शनास आले..
खंडीत समतल चरचा फायदा अधिक अधिक वृक्षारोपण व पावसाचे पाणी जमिनीत मुराविण्याकरिता होईल. सदर उपक्रम सद्य स्थितीला शाळेच्या परिसरात राबविला गेलेला आहे. भविष्यात गावातील भौगोलिक परिस्थितीच्या आधारे व गरजेनुसार स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागाने गाव परिसरात राबविला जाईल.
सदर उपक्रम राबविताना विद्यार्थ्यांना भूगोल, भूमिती व वनस्पती शास्त्राची माहिती मिळाली. त्याचबरोबर पाठ्यपुस्तकामध्ये वाचलेल्या संज्ञा प्रत्यक्षरीत्या कशा वापराव्यात याची माहिती मिळाली. चर खांद्ताना मोजमाप कसे घ्यावे, फुटाचे मीटरमध्ये रुपांतर कसे करावे याबाबत शिकायला मिळाले. चर कोणत्या महिन्यात खोदावी व त्याचा फायदा काय होईल याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. पर्यावरण हा विषय प्रत्यक्ष कृतीतूनच शिकायचा आहे. पाणी या विषयाअंतर्गत जल व माती संवर्धनाचा उपक्रम विद्यार्थी संज्ञा व प्रात्यक्षिकातून शिकले.

पावसाळ्याच्या पूर्व संध्येला पर्यावरण सेवा योजनेचे विद्यार्थी, शिक्षक व योजनेचे सर्व अधिकाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीच फायदा शाळेला भविष्यात नक्कीच होईल. शाळेच्या परिसरात पाणी व माती संवर्धनाचा प्रयोग यशस्वी होईल अशी अशा करण्यास हरकत नाही. या उपक्रमात उत्साहाने सहभागी झालेले विद्यार्थी पुढे जावून गावाच्या पाणी व माती संवर्धनाबाबत नक्कीच महत्त्वपूर्ण योगदान देतील यात शंकाच नाही. 

                           गुजर-निंबाळकरवाडीचे सरपंच व शाळेचे मुख्याध्यापक, योजना प्रमुख यांच्याशी चर्चा करताना प.से.यो.चे अधिकारी


 “ A” फ्रेम पद्धतीने समांतर उताराचे मोजमाप करताना विद्यार्थी


                                                         “ A” फ्रेम पद्धतीने समांतर उताराचे मोजमाप करून रेखांकन करताना विद्यार्थी


                                                                            केलेल्या रेखांकानुसार चर खोदताना विद्यार्थी




                                                                            खोदून पूर्ण  झालेल्या खंडीत समतल चर





No comments:

Post a Comment