अभ्यासातून
संवर्धनाकडे
एखाद्या घटकाची आवड
जो पर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत आपण त्या घटकाच्या मुळाशी जावून त्याचा
अभ्यास करत नाही. असच काहीसे सध्या विद्यार्थ्यांचे फुलपाखरू या घटकाबद्दल झाल
आहे.
आपल्या सभोवताली खूप
सारे फुलपाखरे आपल्याला पहायला मिळतात. रंगेबेरंगी फुलपाखरे या फुलावरून त्या
फुलावर बागडताना पाहण्याचा आनंद निराळाच आहे. यातही लहानपणी आपल्याला फुलपाखरे
पकडायला आणि त्यांचा रंग आपल्या हाताला कसा लागतो हे पहायला खूप आवडते.
पण लाल बहादूर
शास्त्री विद्यालय सालसे, ता. करमाळा येथील इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या
विद्यार्थ्यांचा याबाबत अनुभव जरा वेगळा आहे. सध्या घरी बसून काय करायचे हा
विद्यार्थ्यांसमोर खूप मोठा प्रश्न होता. यामुळे योजने अंतर्गत आपल्या परिसरातील
जैवविविधतेमधील घटकांचा अभ्यास करायचे निश्चित करण्यात आले. यामध्ये
विद्यार्थ्यांनी त्यांच्या परिसरातील झाडे, पक्षी व फुलपाखरांचे निरीक्षण व नोंद
करण्याचा उपक्रम सुरु केला.
या काळात
विद्यार्थ्यांना फुलपाखरू या घटकाबद्दल विशेष आवड निर्माण झालेली पहायला मिळाली.
सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी त्यांच्या परिसरातील फुलपाखरांचे निरीक्षण करण्यास
सुरुवात केली. निरीक्षणा बरोबरच विद्यार्थ्यांनी नोंदी हि ठेवायला सुरुवात केली.
यामध्ये विद्यार्थ्यांनी फुलपाखराचे अंडे, अळी व कोश यांचे ही निरीक्षण व नोंदी
ठेवायला सुरुवात केली. निरीक्षणामुळे विद्यार्थ्यांना बारकावे समजण्यास मदत झाली.
विद्यार्थ्यांचे
निरीक्षण सुरु असतानाच व्हाटसअॅप गृपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना फुलपाखराचे
शरीर रचना, जीवनचक्र याबाबत मार्गदर्शन केले जात होते. आता विद्यार्थी फुलपाखरांचे
जमेल तसे फोटो काढून ते ओळखण्यासाठी गृपवरती पोस्ट करत होते. विद्यार्थ्यांना
फुलपाखरू कसे ओळखावे याबाबत हि मार्गदर्शन केले जात होते.
आता विद्यार्थ्यांनी
हळूहळू फुलपाखरू कोणत्या झाडावर रस पिण्यासाठी येते, कोणत्या झाडावर अंडे घालते
याबाबत निरीक्षण, नोंदी व अभ्यास करायला सुरुवात केली होती. याचबरोबर त्यांना
कशापासून धोका आहे याची हि नोंद विद्यार्थी ठेवत होते.
गेल्या ३
महिन्यापासून विद्यार्थी सातत्याने फुलपाखराचा सविस्तर अभ्यास करत आहेत.
फुलपाखराचे आपल्या पर्यावरणातील महत्त्व विद्यार्थ्यांना पूर्णपणे समजलेले आहे.
यामुळे हे विद्यार्थी फुलपाखरांसाठी आवश्यक असलेले खाद्य वनस्पती व मधुरस
पिण्यासाठी योग्य अशा झाडांच्या बिया संकलित करत आहे. भविष्यात या बियांचे रोपे
तयार करून फुलपाखरांना पूरक असे वातावरण तयार करण्याचा विद्यार्थ्यांचा मानस आहे.
कोणतेही काम वरवरचे न
करता त्याच्या मुळाशी जावून ते पूर्णपणे समजावून घेतले तर त्यामध्ये मनापासून काम
करता येते. या चिमुकल्या हातांनी आता फुलपाखरांचे संवर्धन करण्याचे निश्चित केले
आहे आणि त्यात त्यांना नक्कीच यश मिळेल.
गणेश सातव
पुणे विभाग समन्वयक
पर्यावरण सेवा योजना
विद्यार्थ्यांनी अळी, कोश व फुलपाखराचे काढलेले फोटो.
No comments:
Post a Comment