स्वनिर्मितीचा आनंद घेत नैसर्गिक रंगांमधे रंगले बालगोपाळ
उपक्रम: पर्यावरणपूरक रंगपंचमी.
शाळा : दिगंबरराव बागल माध्य. विद्यालय, कुंभेज,ता.करमाळा,
जि.सोलापूर.
योजना प्रमुख :
कल्याणराव साळुंके
सध्याच्या आधुनिक, प्रगतीच्या व धावपळीच्या युगामधे माणसाचा अर्थार्जनासाठी सातत्याने जीवन संघर्ष सुरू आहे. सुखाच्या मागे धावून दमछाक होत असताना जरासी उसंत मिळावी व क्षणभर का होईना आनंद घेता यावा म्हणूनच आनंदाचा वर्षाव करणाऱ्या सणांचे भारतीय संस्कृतीत प्रयोजन असून त्यास अनन्य साधारण महत्त्व आहे. चैतन्यमय वसंत ऋतूच्या आगमनाबरोबरच इंद्रधनूच्या सप्तरंगांची उधळन करत येणारा सण म्हणजे रंगपंचमी होय.
कुंभेज येथील दिगंबरराव बागल माध्य .विद्यालयात विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंग स्वतः तयार करून रंगपंचमी सण साजरा केला तसेच कोरडे रंग (पावडर ) वापरून पाणी बचतीचा संदेशही दिला.
कृत्रीम रंगांमधे घातक रासायनिक घटक असू शकतात असे रंग आरोग्यास अत्यंत हानीकारक असतात त्यामुळे त्वचेवर डाग पडणे, खाज सुटने, त्वचा जळजळणे, डोळे लाल होणे किंवा गंभीर इजा होणे,पुरळ येणे, तसेच त्वचेचा कर्करोग होण्याची ही शक्यता असते म्हणून असे रंग न वापरणे हीतकारक असते या ऊलट नैसर्गिक रंगांमधील हळद, बेसन, मुलतानी माती इ.घटक त्वचा उजळ करून त्वचेचे सौदर्य वाढवतात थोड्या श्रमात व कमीत कमी खर्चामधे नैसर्गिक रंग तयार करता येतात.
नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी सहज उपलब्ध होणाऱ्या हिरव्या पालेभाज्या,पालक कोथिंबीर , गुलमोहोराची पाने, व कडूनिंबाचा पाला मिक्सरच्या साहाय्याने पेस्ट करून त्यांचा वापर केला. लाल रंग तयार करण्यासाठी गाजर , टोमॅटो यांचा वापर केला. किरमिजी रंग बीटापासून मिळवला तर लाल रंग हा रक्तचंदनाच्या काडया उगाळून तयार करता आला. पिवळा रंग खाण्याच्या हळदीपासून तयार केला. सुके रंग तयार करण्यासाठी मुलतानी माती बेसन पीठ , हळद इ. चा वापर केला.
शरीराला कोणताही अपाय होत नसल्याने मुलांनी ह्या रंगांचा मनमुराद आनंद घेत एकमेकांवर रंग फेकत रंगांचा उत्सव साजरा करून गदिमांच्या 'रंग फेका रे...... ' या गीताची आठवण करून दिली.
'देणे'हा निसर्गाचा गुण तर या उलट 'घेणे'हा मानवाचा स्वभाव बनला आणि ही सवय एवढी बळावली की माणूस निसर्गाला अक्षरक्षः ओरबाडू लागला . म्हणूनच वेळीच सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे. आणि या साठी आपली प्रत्येक कृती आपले प्रत्येक पाऊल निसर्ग संवर्धणासाठी सरसावले पाहिजे. निसर्ग संवर्धनाचा संकल्प करून
महाराष्ट्र शासन पुरस्कृत पर्यावरण सेवा योजनेच्या माध्यमातून पूणे विभागीय समन्वयक गणेश सातव यांच्या मार्गदर्शनानुसार व मुख्याध्यापक हनुमंत पाटील यांच्या प्रोत्साहन तून योजना प्रमुख कल्याणराव साळुंके हे आपले सहकारी शिक्षक श्री.विष्णू पोळ, श्री.सिताराम बनसोडे, श्री.संतोष शिंदे यांच्या सहकार्याने विद्यालयात सर्व सण समारंभ पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करत आहेत.
या अभिनव उपक्रमाचे सरपंच, ग्रामपंचायत कुंभेज, शिवराजे तरुण मंडळ , ज्योतिर्लिंग तरुण मंडळ, जनसेवा तरूण मंडळ , जय महाराष्ट्र तरूण मंडळ,शिवस्वराज्य प्रतिष्ठाण,कुंभेज व पोफळज ग्रामस्थ तसेच पालकांनी कौतुक केले.
No comments:
Post a Comment