निसर्गातील विविध घटकांचे निरीक्षण हि पर्यावरण अभ्यासातील पहिली पायरी मानली जाते. आपल्या परिसरातील विविध घटकांचे आपण केलेले निरीक्षण हे आपले ज्ञान समृद्ध करणारे असते. याबाबतीत शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेले निरीक्षण हे त्यांची एखाद्या विशिष्ट घटकाबाबत समज विकसित करण्यास मदत करते.
पर्यावरण सेवा योजनेमध्ये सध्या विद्यार्थी घरीच राहून विविध घटकांचा अभ्यास करत आहेत. असाच एक अभ्यास अनुराधा ठोंबरे या लाल बहादूर शास्त्री विद्यालय सालसे, ता. करमाळा येथे इयत्ता ८ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने कीटकांबाबत केलेला आहे.
अनुराधाने फक्त निरीक्षणच केले नाही तर तिचा अनुभव छानरित्या शब्दबद्ध सुद्धा केलेला आहे. (अनुराधाने लिहिलेल्या अनुभवामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही.)
इयत्ता ८ वीच्या विद्यार्थिनीने लिहिलेला अनुभव खरच वाचनीय आहे. सर्वांनी तो नक्की वाचवा.
माझा अनुभव
आपण प्रत्येक जीवाशी कसे गुंतत जातो, त्यांना कसा जीव लावतो, माया करतो याची जाणीव मला किटकांनी दिली.
आमच्या खिडकीच्या एका भागाला आम्ही बाग म्हणतो. त्यात उपयोगी झाडे आहेत. जसे पेरू, चिकू, आंबा. त्यातलाच एक कडीपत्ता. हिरवागार पातळ पानांचा नुसता तोडला तरी घमघमाट सुटतो असा. लागतील तशी त्याची चार पान तोडून आणली कि फोडणीचा खमंग वास येतो.
एकदा मी अशीच पान खुडायला गेले अन त्यावर मला कबुतराची विष्टा पडलेली दिसली. जरा मी निरखून पहिले आणि माझा संशय खरा ठरला हि विष्टा नसून एक फसवी छद्रम क्रिया आहे.
विष्टेसम दिसणारे एका फुलपाखराच्या अळ्या, ‘आता हे देखील आले नांदायला’ असा विचार केला आणि कडीपत्ता न खुडताच परतले. दर दिवशी माझ्या कडीपत्त्याच्या पाने फस्त होताना दिसत होती आणि आमची विष्टारुपी खादाड बाळ छान बाळस धरत होती. त्यांचा आकार तर वाढत होताच पण रंग हि बदल होता. पान खाऊन-खाऊन ते छान हिरव्यागार रंगाचे धष्ट-पुष्ट सुरवंट झाले होते. काही दिवसात ते सुस्तावले आणि कोशात जायची वेळ आली. रोजची त्यांची प्रगती बघतानाची मजा आता उत्सुकतेत बदलली. कोशात गेल्यावर मात्र बेचैनी वाढली. त्यातून कधी बाहेर पडेल फुलपाखरू?
रोज हे कोश जैसे थे. मोजून तेराव्या दिवशी कोश रिकामा झालेला मला दिसला. माझ्या न कळत फुलपाखरू उडून गेल होत. फारच वाईट वाटल. त्यामुळे झाल अस कि प्रत्येक कॉमन मॉरमॉन काळ, लाल फुलपाखरू हे आमच्या झाडावर जन्माला आलेल आमचच मित्र असावा अस वाटल.
सुरवंटांनी पान, शेंडे खाऊन-खाऊन कडीपत्त्याची जणू काही छाटणीच केली होती. परत नव्या जोमाने झाड बहरू लागली. फुलपाखरे अंडे घालण्यासाठी आगदी निवडक झाडावर येतात, मधुरस चोखायला मात्र त्यांना विविध तऱ्हेची फुल चालतात. आमच्या बागेत विविध फुले असल्यामुळे फुलपाखरे आकर्षित होतात.त्यात त्याचं आवडत झाड म्हणजे शेवंती. त्यात माझ आवडत फुलपाखरू हमखास येत. त्याची रंगसंगती इतकी न्यारी आहे कि मला ते पिवळी-केशरी, लाल-काळ्या रंगाचा ड्रेस घातल्यासारखा वाटतो. मोठे फुलपाखरच नव्हे तर इवलेसे पक्षीही येतात.
फुलपाखरांचे कमी भाईबंद पतंग बऱ्याचदा येतात. फुल्पाखारांसारखा यांचा रंग नाही. हे बागडायला येत नाहीत. शांतपणे बसायला येतात. आरामात बसलेल्या फुलपाखरांचे पंख दुमडलेले असतात. पतंगाचे उघडे असतात. त्यामुळे त्यांना छान निरखून बघता येत. निरीक्षण करता येत. पतंगाचे शरीर गुटगुटीत, पंख जास्त मखमली आणि त्यांचे अॅण्टेना पिसंसारखा असतो. पतंग जरी फिक्या रंगाचे असले तरी त्यांच्यावर नक्षीकाम अगदी देखण असत. पांढऱ्यावर काळे ठिपके, खाकी रंगावर चॉकलेटी रेषा, राखाडी आणि काळे अगदी एकाच रंगाचे असलेले. पिस्ता पतंग सुद्धा चकचकीत दिसतात.
मला वाटत कीटक निरीक्षणालाही खूप मजा आहे. कधी वाट चुकलेले भ्रमही येतात. मधमाशा तर येतातच. त्यांच्यातही बरीच विविधता दिसते. काही बारीकश्या तर काही भल्या मोठ्या. कधी चुकून घरात हि शिरतात आणि खिडकीच्या काचेवर आदळतात. हल्लीच एक कुंभारमाशी घर बांधायला आली. एक भिंत तिला पसंद पडली. आता तीच घर होईल. तिची पिल्ल येतील अशी वाट मी बघतेय.
मागच्या पावसाळ्याच्या सुमारास चतुराचा एक मोठा थवा खिडकीच्या बाहेर दिसला. चतुर तर नेहमीच दिसतात पण असा थवा मला पहिल्यांदाच दिसला होता. बराच वेळ ते आकाशात एकाच ठिकाणी उडत होते. लहानपणी मी एक जपानी गोष्ट ऐकली होती. त्यात लहान मुलांच रक्षण चतुर करत असताना आणि ती मुल त्यांचे कौतुक म्हणून गाणी गातात. माझे बाबा सांगतात चतुर कीटकांची शिकार करतात. ते आले कि डास कमी होतात. त्यामुळे लहानपणापासून मला चतुर आवडतात. असे चतुर बाहेर बघून मला आनंद झाला. अंधार पडला आणि ते दिसेनासे झाले आणि मी हि विसरून गेले. हे दिसून दोनच दिवस झाले असतील. मी खिडकीतल्या तुळशीपाशी उदबत्ती लावायला गेले तेवढ्यात कोपऱ्यात चिंचेच्या झाडाच्या फांदीवर एक नाही दोन नाही दहा-बारा चतुर झोपलेले दिसले. त्यांचे पातळ, पारदर्शक, नक्षीदार पंख पसरवून. उदबत्तीच्या धुराचा त्रास त्यांना नको म्हणून मी ती परत देवापाशी जाऊन लावली. दुसऱ्या दिवशी सकाळी बघायला गेले तर ते उडून गेलेले होते. परत येतील का नाही अशी धाकधूक होती, ते येवू लागले.
दिवसभर मला ते दिसायचे हवेत उडताना, तर कधी एकाच ठिकाणी घिरट्या घालताना तर कधी सूर मारताना. एखाद्याच निरीक्षण कराव म्हंटल तर अवघडच. त्यांच्या उडण्याचा काही नेमच नाही. कधी कसे वळतील याचा पत्ताच नाही आणि उडण्याचा वेग एवढा कि त्यांच्या गतीला माझी नजर फिरू शकत नाही. आणि एखादा एकाच ठिकाणी हेलिकॉप्टर सारख स्थिर म्हणाव तर क्षणार्धात बेपत्ता. त्यांची उडण्याची तऱ्हा, त्यांचे उडाण कौशल्य एवढ्या जवळून बघण्याची गंमत तर होतीच पण त्यात ते ‘आपले’ असल्याचा आवही होता. रोज संध्याकाळी मी त्यांची घरट्याकडे येण्याची वाट पाहत असते. तुळशीजवळ उदबत्ती लावण सोडून दिल. पण तुळशीपाशी जावून ‘आलात न रे बाबांनो’ अस म्हणायची प्रथा सुरु झाली. ते परत यायचे खरे पण त्यांची संख्या रोडावत होती.
पहिल्यांदा दाटीने बसणारे चतुर आता विरळ होताना दिसत होते. दहा-बारांचे पाच-सहा झाले. अस होत होत दोघेच उरले. एके दिवशी एकच परतला. आता मात्र माझी तंतरली. काय कराव? त्याला घरात दामटून हि ठेवता येत नव्हत. त्यानंतर ज्याची भीती होती तेच घडल. तो हि परत नाही आला.
आकाशात राहायला गेलेले पक्षी, झाड, निसर्ग हे सोबत राहायला आलेत. यांची सोबत अंगवळणी पडत होतीच कि फुलपाखर. पतंग, चतुर हे हि राहायला आलेत. ते नेहमी प्रमाणे आले नाहीत कि जीव धास्तावयचा.
लेकीची जशी आई घरी यायची वाट पाहते तशी मी त्यांची पाहते.
विद्यार्थिनी – अनुराधा ठोंबरे
इयत्ता – ८ वी
मार्गदर्शक – श्री गणेश सातव सर.