Tuesday, 21 October 2014


‘इको व्हिलेज’ अंतर्गत शाळेने पूर्ण केला कृती कार्यक्रमाचा पहिला टप्पा
शाळेचे नाव – सावित्री कन्या प्रशाला, रानमसले , ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर
  पर्यावरण सेवा योजने अंतर्गत दिनांक ११ व १२ ऑगस्ट २०१४ रोजी योजेनेत कार्यरत असणाऱ्या १६ शाळेची शिक्षक सहविचार बैठक घेण्यात आली. सदर बैठकीचा उद्देश शाळेने राबविलेल्या उपक्रमाची माहिती इतर शाळांना व्हावी, तसेच योजनेचे वार्षिक कृती कार्यक्रम आराखडा निश्चित करणे असा होता.
यामध्ये सावित्री कन्या प्रशाला, रानमसले, सोलापूर येथील शाळेने इको-व्हिलेज उपक्रम निश्चित केला. यानुसार योजना प्रमुखांनी वार्षिक कृती कार्यक्रम आराखडा निश्चित केला
सदर कृती कार्यक्रमाचे आठवडा निहाय नियोजन करण्यात आले. यानुसार शाळेने कृती कार्यक्रम राबविणे आपेक्षित होते. योजना प्रमुख श्री. संग्राम कांबळे यांनी सदर नियोजना नुसार उपक्रम राबविण्यास सुरुवात केली.


१. वृक्षलागवड 
        I.            रोपवाटिका तयार करणे
यामध्ये त्यांनी विद्यार्थिनींच्या माध्यमातून शाळेच्या परिसरात स्थानिक वाणाच्या ५० बिया वापरून रोपवाटिका तयार केली. या ५० बियामध्ये करंज, गोड चिंच, आंबट चिंच, शिरीष, बिब्बा, जारूळ, शिंदी व सिताफळ या झाडांच्या बिया होत्या. प्रथमतः विद्यार्थीनीना मार्गदर्शक सूचनेनुसार बीजप्रक्रिया केली. काही बियांना गरम पाण्याची, काहीना गार पाण्याची, काहीना शेणाची प्रक्रिया देण्यात आली.यानंतर विद्यार्थिनीनी रोपवाटिका बनविताना पिशव्या कशाप्रकारे भरल्या जातात याबाबत माहिती घेतली व त्यानंतर स्वतः पिशव्या भरून त्यामध्ये बिया लावल्या. प्रत्येक विद्यार्थिनीला एक पिशवी दत्तक देवून सदर बियांची रुजवण क्षमतेची अभ्यास करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
लागवड केलेल्या ५० बियांपैकी सद्यस्थितीला चिंचेची ९, करंजचे १, शिरीषचे १ व सिताफळाचे १ अशी एकूण १२ रोपे उगवली आहेत.
        I.            वृक्षारोपण
शाळेने प.से.यो. अंतर्गत शाळा व गाव परिसरात वड व पिंपळाचे २० झाडांची लागवड केली. त्याचबरोबर शाळेला ग्रामपंचायतीमार्फत चिंच, आपटा व कडूलिंबाची झाडे मिळाली होती. यातील दोन आपट्याची झाडे शाळा परिसरात लावण्यात आले. उर्वरित रोपे गावातील नागरिकांच्या घरासमोर, परसबागेत व काही मंदिर परिसरात लावण्यात आली.
        I.            रोपांचे संरक्षण व जतन
शाळेने फक्त वृक्षारोपणाचा उपक्रम केला नाही पण वृक्षसंवर्धनासाठी टाकावू वस्तू पासून कुंपण कसे बनवू शकतो याची चाचपणी केली व प्रायोगिक तत्त्वावर शाळा परिसरात बांबूच्या काठी व खराब झालेल्या साड्यांचा वापर करून कुंपण तयार केले. त्याचबरोबर गावपरिसरात लागवड केलेल्या दोन झाडांना ग्रामस्थांच्या मदतीनी वेताच्या काड्या वापरून कुंपण तयार करण्यात आले. 

सदर उपक्रम शाळेने फक्त शाळा परिसरापुरतेच मर्यादित न ठेवता त्याचा प्रचार व प्रसार गाव परिसरात केला आहे. तसेच लोकसहभागावर शाळेने जास्तीत जास्त भर दिला आहे. विद्यार्थीनी शाळा परिसरातील रोपवाटिका व रोपांची निगा राखत आहेत, त्याचबरोबर गावपरिसरात लागवड केलेल्या रोपांची स्थिती अभ्यासून त्यांचीही निगा राखत आहेत. तसेच स्थानिक नागरिकांना सदर रोपांची काळजी घेण्याबाबत आवाहन करत आहेत. त्यांच्या प्रयत्नाला नक्कीच यश मिळेल.
उपक्रम राबवित असताना विद्यार्थीनीना मुख्याध्यापिका सौ. अनिता गरड, योजना प्रमुख श्री. संग्राम कांबळे व शाळेतील इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

                                             शाळेचे वार्षिक  कृती उपक्रम नियोजन


                                                              वृक्ष दिंडी
                                            गाव परिसरात वृक्षारोपण

                                    शाळेच्या परिसरात विद्यार्थिनीनी तयार केलेली रोपवाटिका

                        शाळा परिसरातील रोपांना विद्यार्थिनीनी अशा प्रकारे टाकावू वस्तूपासून कुंपण तयार केले.

गाव परिसरात नागरिकांच्या माध्यमातून अशा प्रकारे कुंपण तयार करण्यात आले आहे.

Wednesday, 15 October 2014


दसऱ्या निमित्त आपट्यांच्या रोपांचे वाटप 


न्यू इंग्लीश स्कूल, सोलगाव ता. राजापूर जि. रत्नागिरी 

दिनांक- ०१/१०/२०१४
=================================

"पर्यावरणाच लेणं, हेच खर सोनं" 

या सुविचाराचे महत्व पटविण्यासाठी व लोकांच्या मनात ते रुजवून ठेवण्यासाठी सोलगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केलेला हा एका छोटा, प्रायोगिक व लोकसहभागातून कृती उपक्रम. दोन दिवसावर आलेल्या दसऱ्याच्या सणानिमित्ताने प. से. यो.तील विद्यार्थ्यांनी आपट्याच्या रोपांचे वाटप व वृक्षारोपण केले. आपट्याची एकूण ६ रोपे घेऊन सरस्वती मंदिर या ठिकाणी ग्रामस्थांच्या उपस्थितीत योजनाप्रमुख श्री. सचिन पाटील सर यांनी थोडक्यात दसरा सणानिमित्त आपट्याच्या रोपावर होणाऱ्या नुकसानीबद्दल तसेच भविष्यात सदर संस्कृती, परंपरा व सण टिकून ठेवण्यासाठी आपट्यांच्या रोपांची लागवड व आवश्यक संवर्धन या विषयी  माहिती व महत्व मांडले. तसेच विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून संदेश, महेंद्र, सुचिता व मीनल यांनी माहिती दिली. कार्यक्रमास प्रथम नागरिक सरपंच सौ. मायुरीताई कुळ्ये, उप सरपंच श्री. शशिकांत बाणे ग्रामसेवक श्री गौरक्षिणात शेलार सदस्य श्री सुनील गुरव, श्री प्रभाकर गुरव व श्री विकास गुरव तसेच शिक्षक श्री पंडित सर कर्मचारी श्री अजित गुरव व विकास गुरव यांनी वृक्षारोपणास खड्डा खोदण्यास मदत केली. 
उपसरपंच, ग्रामस्थ, योजनाप्रमुख व विद्यार्थ्यांच्या हस्ते सरस्वती मंदिराच्या परिसरात एका आपट्याच्या रोपच रोपण केले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता व वृक्ष संवर्धन व पर्यावरणाचे हित लक्षात ठेवून सण साजरे करण्याच्या विचाराची सुरुवात झाली. 


सरस्वती मंदिराच्या प्रांगणात उपस्थितीत ग्रामस्थांना आपट्याची रोपे भेट देताना पर्यावरण सेवा योजनेची टीम 



आपट्याच्या रोपट्याचे रोपण करताना सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, विद्यार्थी व शिक्षक.



न्यू इंग्लिश स्कूल, सोलगाव शाळेतील "पर्यावरण सेवा योजना" गट व शिक्षकवृंद.


Friday, 10 October 2014

पर्यावरण सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी बनवले निर्माल्यापासून कंपोस्ट खत.

महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग पुरस्कृत “ पर्यावरण सेवा योजने ” अंतर्गत नूतन ज्ञान मंदिर अडावद ता.चोपडा जि.जळगाव या शाळेतील ५० विद्यार्थी समवेत योजनाप्रमुख श्री.पी.डी.चौधरी यांनी  २३ सार्वजनिक “ गणपती व दुर्गा देवी  उत्सव “ मंडळांकडून विद्यार्थ्यानी अंदाजे ३० किलो  निर्माल्य  संकलित करण्यात आले व गावकऱ्यांना निर्माल्यापासून होणारे जलप्रदूषण याविषयी माहिती देण्यात आली.व निर्माल्य दान करण्याचे आवाहन करण्यात आले निर्माल्य संकलनाचा हा उपक्रम राबवण्यात आला.संकलीत निर्माल्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यात आले.गावातून या अभिनव उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


अडावद ता.चोपडा जि.जळगाव येथील गणेश उत्सव निर्माल्य संकलन करतांना पर्यावरण सेवा योजनेतील विद्यार्थी व योजनाप्रमुख श्री.पी.डी.चौधरी 


अडावद ता.चोपडा जि.जळगाव येथील दुर्गा उत्सव दरम्यान  निर्माल्य संकलन करतांना पर्यावरण सेवा योजनेतील विद्यार्थी व योजनाप्रमुख श्री.पी.डी.चौधरी 



निर्माल्य पासून कंपोस्ट खत                       गणेश उत्सव निर्माल्य संकलन बातमी जळगाव पुण्य नगरी दि.१६-०९-२०१४  

                     दुर्गा देवी उत्सव निर्माल्य संकलन बातमी जळगाव दैनिक सकाळ दि. ०८-१० -२०१४

Tuesday, 7 October 2014

टाकावू वस्तूपासून शाळेच्या परिसरातील झाडांना कुंपण तयार करणे

शाळेचे नाव – सावित्री कन्या प्रशाला, रानमसले, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर

वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे हा पर्यावरण सेवा योजनेतील एक मुख्य कृती कार्यक्रम आहे. याचबरोबर स्थानिक प्रजातीच्या वृक्षांचे बीज संकलन करणे, रोपवाटिका तयार करणे व वृक्षारोपण करणे हा सुद्धा प्रमुख उपक्रम आहे. योजने अंतर्गत अत्तापर्यंत शाळेने वृक्षारोपण केले होते, परंतु परिसरातील जनावरे लागवड केलेल्या रोपांची नासधूस करत असत. त्यामुळे लागवड केलेली रोपे जगू शकली नाहीत. या सर्व बाबींचा मुख्याध्यापिका सौ. अनिता गरड, योजना प्रमुख श्री. संघपाल कांबळे व सहकारी शिक्षकांनी विचार केला. त्याचबरोबर पुणे येथे पर्यावरण सेवा योजने (प.से.यो.) अंतर्गत झालेल्या सहविचार बैठकीत दिलेली वृक्षसंवर्धनाची कल्पना शिक्षकांनी प्रत्यक्षात उतरवली.

यामध्ये प्रथमतः योजना प्रमुख व प.से.यो. गटाने घराच्या परिसरात टाकून दिलेल्या बांबूच्या लाकडे एकत्रित केले. एकत्रित केलेले लाकडे योग्य मोजमाप घेवून कापून घेतले. कापून घेतलेली लाकडे  रोपांभोवती खड्डा खांदून रोवून घेतले. त्यानंतर विद्यार्थिनीनी घरातील खराब झालेल्या साड्या एकत्रित करून रोपाभावती रोवलेल्या बांबूच्या लाकडांना गुंडाळल्या जेणेकरून कोणतेही जनावर सहजरीत्या रोप खाऊ शकणार नाही.


योजना प्रमुख व विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात वृक्षसंवर्धनाच्या बाबतीत केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. याचबरोबर गावातील ग्रामस्थांना शाळेत बोलावून सदर उपक्रमाचा उद्देश व महत्त्व प.से.यो.तील विद्यार्थिनी समजावून सांगणार आहेत. शाळेमार्फत गावात वृक्षारोपण केलेले आहे, सदर रोपांचे संवर्धन अशाप्रकारे करावे याबाबत विद्यार्थिनी गावकऱ्यांना आवाहन करणार आहेत.    


Wednesday, 1 October 2014

विद्यार्थ्यांनी साजरा केला पर्यावरणपूरक गणेशोत्सव
शाळेचे नाव – सुमति बालवन, गुजर-निंबाळकरवाडी, कात्रज, पुणे
सुमति बालवन शाळेमध्ये पर्यावरण सेवा योजना तीन वर्षापासून कार्यरत आहे. शाळेमध्ये योजने अंतर्गत विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यामध्ये योजनेच्या माध्यमातून फक्त जनजागृती न करता प्रत्यक्ष कृतीमधून विविध गोष्टी कशाप्रकारे बिंबवल्या जातील यावर मुख्याध्यापिका व योजना प्रमुखांचा भर असतो.
याचाच एक भाग म्हणून शाळेत प्रत्येक वर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातो. विद्यार्थ्यांनी गाव परिसरात जावून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यापुर्वी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शाडू मातीचे गणपती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर कार्यशाळेस ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.  ८ विद्यार्थ्यांचा एक याप्रमाणे विद्यार्थ्यांचे ६ गट तयार करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी १३ गणपतीच्या शाडू मातीच्या मूर्ती बनविल्या. मूर्तिकार श्री. चेतन यांनी शाडू मातीचे गणपती बनविण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक गणपती बनविण्याचा आनंद घेतला. सदर उपक्रम विद्यार्थी फक्त गणपती बनविण्यापुरता मर्यादित ठेवणार नाहीत. विद्यार्थी या गणपतींची प्रतिष्ठापना शाळेत व निवडक विद्यार्थ्यांच्या घरी करणार आहेत. लहानपनातच विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनात उचललेले पाऊल नक्कीच बहुमुल्य आहे.
सदर उपक्रम राबविताना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता गुळूमकर व योजना प्रमुख सोनाली बगाडे मॅडम यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.

   
विद्यार्थ्यांना शाडू मातीचे गणपती बनविण्याचे मार्गदर्शन करताना मूर्तिकार चेतन

शाडूच्या मातीचे गणपती बनविताना विद्यार्थी

विद्यार्थ्यांनी बनविलेला शाडू मातीचा गणपती

विद्यार्थ्यांनी बनविलेले शाडू मातीचा गणपती

शाडू मातीच्या गणपतीला पर्यावरणपूरक रंग देताना विद्यार्थी

रंग देवून झालेली गणपतीची मुर्ती 
दैनिक लोकमतने सुमति बालवन शाळेने राबविलेल्या उपक्रमाची बातमी दि. २९/०८/२०१४ रोजी प्रसिद्ध केली.