Tuesday, 21 October 2014


‘इको व्हिलेज’ अंतर्गत शाळेने पूर्ण केला कृती कार्यक्रमाचा पहिला टप्पा
शाळेचे नाव – सावित्री कन्या प्रशाला, रानमसले , ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर
  पर्यावरण सेवा योजने अंतर्गत दिनांक ११ व १२ ऑगस्ट २०१४ रोजी योजेनेत कार्यरत असणाऱ्या १६ शाळेची शिक्षक सहविचार बैठक घेण्यात आली. सदर बैठकीचा उद्देश शाळेने राबविलेल्या उपक्रमाची माहिती इतर शाळांना व्हावी, तसेच योजनेचे वार्षिक कृती कार्यक्रम आराखडा निश्चित करणे असा होता.
यामध्ये सावित्री कन्या प्रशाला, रानमसले, सोलापूर येथील शाळेने इको-व्हिलेज उपक्रम निश्चित केला. यानुसार योजना प्रमुखांनी वार्षिक कृती कार्यक्रम आराखडा निश्चित केला
सदर कृती कार्यक्रमाचे आठवडा निहाय नियोजन करण्यात आले. यानुसार शाळेने कृती कार्यक्रम राबविणे आपेक्षित होते. योजना प्रमुख श्री. संग्राम कांबळे यांनी सदर नियोजना नुसार उपक्रम राबविण्यास सुरुवात केली.


१. वृक्षलागवड 
        I.            रोपवाटिका तयार करणे
यामध्ये त्यांनी विद्यार्थिनींच्या माध्यमातून शाळेच्या परिसरात स्थानिक वाणाच्या ५० बिया वापरून रोपवाटिका तयार केली. या ५० बियामध्ये करंज, गोड चिंच, आंबट चिंच, शिरीष, बिब्बा, जारूळ, शिंदी व सिताफळ या झाडांच्या बिया होत्या. प्रथमतः विद्यार्थीनीना मार्गदर्शक सूचनेनुसार बीजप्रक्रिया केली. काही बियांना गरम पाण्याची, काहीना गार पाण्याची, काहीना शेणाची प्रक्रिया देण्यात आली.यानंतर विद्यार्थिनीनी रोपवाटिका बनविताना पिशव्या कशाप्रकारे भरल्या जातात याबाबत माहिती घेतली व त्यानंतर स्वतः पिशव्या भरून त्यामध्ये बिया लावल्या. प्रत्येक विद्यार्थिनीला एक पिशवी दत्तक देवून सदर बियांची रुजवण क्षमतेची अभ्यास करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
लागवड केलेल्या ५० बियांपैकी सद्यस्थितीला चिंचेची ९, करंजचे १, शिरीषचे १ व सिताफळाचे १ अशी एकूण १२ रोपे उगवली आहेत.
        I.            वृक्षारोपण
शाळेने प.से.यो. अंतर्गत शाळा व गाव परिसरात वड व पिंपळाचे २० झाडांची लागवड केली. त्याचबरोबर शाळेला ग्रामपंचायतीमार्फत चिंच, आपटा व कडूलिंबाची झाडे मिळाली होती. यातील दोन आपट्याची झाडे शाळा परिसरात लावण्यात आले. उर्वरित रोपे गावातील नागरिकांच्या घरासमोर, परसबागेत व काही मंदिर परिसरात लावण्यात आली.
        I.            रोपांचे संरक्षण व जतन
शाळेने फक्त वृक्षारोपणाचा उपक्रम केला नाही पण वृक्षसंवर्धनासाठी टाकावू वस्तू पासून कुंपण कसे बनवू शकतो याची चाचपणी केली व प्रायोगिक तत्त्वावर शाळा परिसरात बांबूच्या काठी व खराब झालेल्या साड्यांचा वापर करून कुंपण तयार केले. त्याचबरोबर गावपरिसरात लागवड केलेल्या दोन झाडांना ग्रामस्थांच्या मदतीनी वेताच्या काड्या वापरून कुंपण तयार करण्यात आले. 

सदर उपक्रम शाळेने फक्त शाळा परिसरापुरतेच मर्यादित न ठेवता त्याचा प्रचार व प्रसार गाव परिसरात केला आहे. तसेच लोकसहभागावर शाळेने जास्तीत जास्त भर दिला आहे. विद्यार्थीनी शाळा परिसरातील रोपवाटिका व रोपांची निगा राखत आहेत, त्याचबरोबर गावपरिसरात लागवड केलेल्या रोपांची स्थिती अभ्यासून त्यांचीही निगा राखत आहेत. तसेच स्थानिक नागरिकांना सदर रोपांची काळजी घेण्याबाबत आवाहन करत आहेत. त्यांच्या प्रयत्नाला नक्कीच यश मिळेल.
उपक्रम राबवित असताना विद्यार्थीनीना मुख्याध्यापिका सौ. अनिता गरड, योजना प्रमुख श्री. संग्राम कांबळे व शाळेतील इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

                                             शाळेचे वार्षिक  कृती उपक्रम नियोजन


                                                              वृक्ष दिंडी
                                            गाव परिसरात वृक्षारोपण

                                    शाळेच्या परिसरात विद्यार्थिनीनी तयार केलेली रोपवाटिका

                        शाळा परिसरातील रोपांना विद्यार्थिनीनी अशा प्रकारे टाकावू वस्तूपासून कुंपण तयार केले.

गाव परिसरात नागरिकांच्या माध्यमातून अशा प्रकारे कुंपण तयार करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment