रोपवाटिका – शिकण्याचा आनंद
शासनाने वर्ष २०१६ मध्ये २ कोटी रोप लागवडीचे उद्दिष्ट्य ठेवले होते. त्यानुसार प्रत्येक शासकीय सेवेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्याना ठराविक झाडे लावण्याचे उद्दिष्ट्य दिले होते. याचबरोबर समाजात आता प्रसारमाध्यमातून झाडे लावण्याबाबतचे बरेचसे प्रबोधन होत आहे. यामुळे वर्षाच्या सुरुवातीला रोपे विकत घेवून त्यांची लागवड करण्यावर सर्वांचा भर असतो. त्यामुळे उपलब्ध होतील ती सर्व रोपे घेवून लावण्यात येतात.
सन २०१६-१७ मध्ये पुणे विभागात योजने अंतर्गत सहभागी असणाऱ्या पुणे व सोलापूर जिल्ह्यातील ११ शाळेमध्ये स्थानिक झाडांची रोपवाटिका बनविण्याचा निर्णय शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी चर्चा करून घेतला. रोपवाटिका तयार करण्याचा उद्देश फक्त बिया आणून लावणे व रोपे तयार करणे एवढाच नव्हता. यामध्ये विद्यार्थ्यांना झाडांची ओळख होणे, फुलांची, फळांची व बियांची ओळख होणे, बिया संकलन करणे त्यांची साठवणूक पद्धती समजावून घेणे, शास्त्रीय पद्धतीने बिया पिशव्यामध्ये लावणे, बियांच्या उगवण क्षमतेचा अभ्यास करणे, रोपांच्या वाढीचा अभ्यास करणे अशा टप्प्यांचा समावेश होता.
रोपवाटिकेची सुरुवात बिया गोळा करण्यापासून झाली. यामध्ये मागच्या उन्हाळ्यात विद्यार्थ्यांनी त्यांच्या परिसरातील झाडांच्या बिया संकलित केल्या. उन्हाळ्यात संकलित केलेल्या बिया जून – जुलैपर्यंत टिकवायच्या होत्या. यासाठी विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या बिया राखेत ठेवल्या व त्यामध्ये कडूलिंबाचा पाला घातला. यानंतर विद्यार्थ्यांनी जुलै महिन्यात शास्त्रीय पद्धतीने पिशव्या भरून त्यामध्ये बिया लावल्या. यामध्ये माती व खत किती घ्यायचे, पिशवी किती भरायची, बिया किती खोलीवर लावायच्या याचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी बिया पिशवीमध्ये लावल्या. बिया पिशवीत लावून विद्यार्थ्यांची जबाबदारी संपली नाही. बी लावल्यापासून ती किती दिवसात उगवून येते याची नोंद प्रत्येक विद्यार्थ्यांनी ठेवली. लावलेल्या बियापैकी किती बिया उगवल्या याच्या आधारावर बियांची उगवण क्षमता समजावून घेतली.
पुणे विभागातील ११ शाळेतील रोपवाटिकेमध्ये विद्यार्थ्यांनी ४२ वेगवेगळ्या प्रकारच्या स्थानिक झाडांच्या बिया वापरून रोपवाटिका तयार केली. योजने अंतर्गत शाळामध्ये १०८४९ बिया लावण्यात आल्या होत्या. लावलेल्या १०८४५९ बियापैकी ५५१२ बिया उगवून आल्या. ५५१२ रोपांपैकी १९८० (३६%) रोपे शाळेत येणारे पाहुणे, ग्रामस्थ, विद्यार्थ्यांना देण्यात आली तर काही शाळेच्या परिसरात लावण्यात आली. तर १९३७ (३५%) रोपे उगवून आल्यानंतर पुरेसे संरक्षण नसल्यामुळे तर यातील काही रोपे उगवून आल्यानंतर पाण्याअभावी जळून गेली. उर्वरित १५९५ (२९%) रोपे उन्हाळ्यातही विद्यार्थी व शिक्षक जोपासत आहेत.
रोपवाटिका उपक्रम फक्त रोपे बनविण्यापर्यंत मर्यादित राहिला नाही यामध्ये विद्यार्थ्यांनी गणित, विज्ञान, भूगोल या विषयाचा हि अभ्यास केला. एका शिक्षकांनी रोपवाटिका उपक्रम इंग्रजी विषयातील एक धड्याशी जोडून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून समजावून सांगितला.
शाळेमध्ये अंदाजित १००० रोपांची रोपवाटिका तयार करण्याचे उद्दिष्ट होते. परंतु मोठ्या झालेल्या रोपांच काय करायचं हा शाळेसमोर प्रश्नच होता. शाळेमध्ये तयार झालेली रोपे ग्रामस्थांना वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण यामध्ये रोपांच्या बदल्यात पैसे न घेता (cashless) ग्रामस्थांकडून वस्तू किवा सेवा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
उदा. करंजाचे १० झाड शाळेने ग्रामस्थांना दिल्यानंतर त्या किमतीची वस्तू किवा त्याबदल्यात श्रम गावकऱ्यानी शाळेसाठी द्यावे असे ठरवण्यात आले. पहिल्यांदा हे जरा अवघड वाटले, परंतु सालसे (ता. करमाळा) शाळेतील अनुभव प्रेरणादायी ठरला. गावातील एका संस्थेने त्यांच्या परिसरामध्ये लावण्यासाठी ४० रोपे शाळेच्या रोपवाटिकेतून घेतली. या रोपाच्या बदल्यात पैसे न घेण्याची भूमिका शिक्षकांनी घेतली. याचबरोबर शिक्षकांनी पैसे न घेण्याची भूमिका हि समजावून सांगितली व शाळेला उपयोगी अशी वस्तू देण्याची विनंती केली. शाळा पैसे घेत नाही अस ऐकणे त्यांच्यासाठी आश्चर्याचा धक्काच होता. परंतु पुढच्याच क्षणी त्या संस्थेने स्वेच्छेने शाळेसाठी २००० लिटरची पाण्याची टाकी दिली. यामुळे रोपवाटिकेच्या व्यवहारातून पैसा काढून वस्तू स्वरुपात व्यवहार केल्यामुळे पारदर्शकता आली व शाळा, गाव व इतर संस्थेमध्ये जिव्हाळ्याचे वातावरण तयार होत आहे. .
रोपवाटिका हा शाळेचा फक्त एक उपक्रम न राहता, यातून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण मिळाले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या परिसरातील झाडांची ओळख करून घेतली. बी पासून रोप होण्याचा प्रवास विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवला आणि फक्त पुस्तकात न वाचता तर प्रत्यक्ष कृतीतून वैज्ञानिक दृष्ट्या बऱ्याचशा गोष्टी समजून घेतल्या.
अशाप्रकारे पर्यावरण सेवा योजनेच्या माध्यमातून शाळा व गाव पातळीवर रोपवाटिका उपक्रम जोरदारपणे राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक शिक्षकांबरोबर ग्रामस्थ हि करत आहेत.
महाराष्ट्र शासन, पर्यावरण विभाग पुरस्कृत पर्यावरण सेवा योजना माध्यमिक शाळेमध्ये राबविली जाते. सदर योजनेसाठी राज्य सनियंत्रण संस्था म्हणून पर्यावरण शिक्षण केंद्र काम पाहते. पर्यावरण सेवा योजनेमध्ये प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. बहुतेक वेळा शासकीय योजना म्हणजे अतिरिक्त जबाबदारी असा समज होतो. परंतु पर्यावरण सेवा योजनेमध्ये पर्यावरण हा विषय अभ्यासक्रमातील इतर विषयांशी जोडून कृतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवला जातो. योजने अंतर्गत पाणी, उर्जा, घनकचरा, जैवविविधता व संस्कृती आणि वारसा या विषयवार काम केले जाते. योजनेचा मुख्य उद्देश हा स्थानिक पर्यावरण समस्या शोधून त्या लोकसहभागातून सोडवणे, भविष्यात पर्यावरणीय दृष्ट्या जबाबदार नागरिक तयार करणे असा आहे.
गणेश सातव
विभाग समन्वयक,
पर्यावरण सेवा योजना (महाराष्ट्र शासन, पर्यावरण विभाग पुरस्कृत)
पर्यावरण शिक्षण केंद्र, पुणे
विभाग समन्वयक,
पर्यावरण सेवा योजना (महाराष्ट्र शासन, पर्यावरण विभाग पुरस्कृत)
पर्यावरण शिक्षण केंद्र, पुणे